बोरगाव दे / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील अंकलगी येथे उसाच्या फडात अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आज सकाळी शिवलिंगप्पा संगणा विजापूरे रा.अंकलगी यांच्या शेतात ही घटना घडली. पल्लवी शिवाजी चव्हाण असे मृत मुलीचे नाव आहे. लहान मुलीचे जागेवरच प्राण गेले आहे. ट्रॅक्टर चालक धोंडेश विजापुरे याच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद शिवाजी गोरोबा चव्हाण यांनी दिली आहे.
विजापूरे यांच्या शेतातील तोडलेले ऊस नंजु पुनप्पा संगदरे रा अंकलगी यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत होते. ऊसतोड कामगार शिवाजी चव्हाण मूळगाव करजखेडा ता. तुळजापूर हे आपल्या ४ वर्षाच्या पल्लवी नावाच्या मुलीला उसाच्या फडात झोपी घातले होते. त्यावेळी शिवलिंगप्पा संगणा विजापूरे यांचा मुलगा धोंडेश विजापुरे हा आर टि ओ पासिंग न केलेला बिगर नंबरचा ट्रॅक्टर इंजिन घेऊन आला. यावेळी उपस्थित ऊस तोड कामगारांनी लहान मुले झोपी गेले आहेत म्हणून धोंडेश याला ट्रॅक्टर घेऊन येऊ नकोस म्हणून हटकले. पण धोंडेश ट्रॅक्टर मध्ये मोठ्या आवाजात टेपची गाणी लावून ट्रॅक्टर उसाच्या फडात वेगात घेऊन आला. त्याच वेळी शेतामध्ये झोपलेल्या पल्लवी शिवाजी चव्हाण वय ४ हिच्या डोक्यावरून व मानेवरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागेवरच प्राण गेले.
सदर बाब ट्रॅक्टर चालक धोंडेश विजापुरे कळताच ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अशी माहिती फिर्यादीत दिली आहे. उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात मयत मुलीला आणण्यात आले पण तपासणी आधीच मुलगी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदर घटनेबाबत ट्रॅक्टर चालकावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छबु बेरड हे करीत आहेत.