रचला इतिहास – 12 दिवसांत चित्रित केले 40 मिनिटांचे दृश्य
अंतराळात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण करण्याचा इतिहास रचल्यावर रशियन फिल्म क्रू रविवारी पृथ्वीवर परतला आहे. ‘चॅलेंज’ चित्रपटाच्या एका दृश्याच्या शूटिंगसाठी अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 12 दिवस वास्तव्य करणाऱया या पथकात अभिनेत्री यूलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लिम शिपिंगे सामील आहे. तर त्यांच्यासोबत अंतराळवीर ओलें नॉवित्सकी देखील पृथ्वीवर परतले आहेत. या पथकाच्या अंतराळयानाने रविवारी पहाटे 6.45 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अंतराळस्थानकावरून उड्डाण केले होते. सुमारे 3.5 तासांनी सकाळी 10.05 वाजता कजाकिस्तानात यशस्वीपणे लँड झाले आहे.


तिघांनाही एका रशियन हेलिकॉप्टरद्वारे कजाकिस्तानच्या कारागांडा शहरात रिकव्हरी सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. यापूर्वी पेरेसिल्ड आणि शिपेंको शूटिंगसाठी 5 ऑक्टोबर रोजी अंतराळात पोहोचले होते.
चॅलेंज चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पथकाला प्रशिक्षण देण्यात आले होते. चित्रपटातील विविध दृश्ये चित्रित करण्यासाठी पथकाने अंतराळात 12 दिवस वास्तव्य करताना अंतराळ स्थानकावर 35-40 मिनिटांचे एक दृश्य चित्रित केले आहे. अंतराळवीराला वाचविण्यासाठी अंतराळ स्थानकात पोहोचणाऱया एका महिला डॉक्टरची कथा या चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे.
टॉम क्रूजला टाकले मागे


चॅलेंज चित्रपटाच्या शूटिंगसोबतच रशियाने हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूजला मागे टाकले आहे. टॉम आणि एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने एका चित्रपटाचे चित्रिकरण अंतराळात करण्याची घोषणा केली होती.