Tarun Bharat

अकरा आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची

9 जणांवर गंभीर स्वरुपाचे आरोप, मायकल लोबो सर्वात श्रीमंत आमदार, एडीआर संघटनेकडून सर्व आमदारांची माहिती सादर

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील 39 आमदारांपैकी 11 आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून हे प्रमाण 28 टक्के एवढे आहे. 9 आमदारांवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यातील एकमेव आमदारावर महिलांवरील अत्याचारासंदर्भात गंभीर आरोप आहे. भाजपच्या 27 पैकी सर्वाधिक मालमत्ता असणारे आमदार हे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत. राज्यातील 39 आमदार हे करोडपती आहेत. मंत्री मायकल लोबो, आमदार प्रतापसिंह राणे व आमदार पांडुरंग मडकईकर हे सर्वाधिक मालमत्ता असणारे आमदार आहेत.

असोसिएट फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संघटनेने निवडणुकीला दोन महिने असताना सोमवारी राज्यातील लुईझिन फालेरो यांच्यासह 40 ही आमदारांवर सविस्तर माहिती सादर केली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या सर्व उमेदवारांनी जो आपला अहवाल निवडणूक आयुक्तांना प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केला होता, त्या आधारे या सर्व आमदारांचा लेखाजोखा एडीआरने सादर केलेला आहे. यातील बहुतांश आमदार हे आगामी निवडणुकीस उभे रहाणार असून या संदर्भातील अहवाल जनतेला कळावा म्हणून या संस्थेने सादर केलेला आहे.

आपल्या आमदाराला ओळखा अशा पद्धतीचा हा अहवाल आहे. 23 टक्के आमदारांवर गंभीर पद्धतीचे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारावर महिलांविषयक गुन्हेगारीचा गंभीर आरोप कलम 376 अंतर्गत आहे. भाजपच्या 27 पैकी 7 आमदारांवर (26 टक्के) गुन्हेगारीसंदर्भात आरोप आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांपैकी 1 (33 टक्के) आमदार, गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांपैकी 1 (33 टक्के) आमदार, राष्ट्रवादीचा 1 आमदार (100 टक्के), 3 अपक्ष आमदार त्यांनीही आपल्यावर असलेल्या आरोपांची सविस्तर माहिती अर्ज भरताना दिलेली होती.

सर्व चाळीसही आमदार करोडपती

राज्यातील 40 पैकी 40 ही आमदार हे करोडपती आहेत. राज्यातील सरसकट आमदारांची मालमत्ता ही रु. 11.75 कोटींची आहे तर भाजप आमदारांची सरसकट मालमत्ता ही रु. 11.97 कोटींची आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांची मालमत्ता सरसकट रु. 17.07 कोटींची आहे तर गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांची मालमत्ता प्रत्येकी रु. 8. 55 कोटींची, राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराची मालमत्ता रु. 13.06 कोटीची, मगो पक्षाच्या आमदाराची मालमत्ता रु. 10.58 कोटी तर 3 अपक्ष आमदारांची मालमत्ता प्रत्येकी रु. 4.14 कोटींची भरते.

सर्वात श्रीमंत आमदार

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो हे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची मालमत्ता ही 54 कोटींची, कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे यांची मालमत्ता रु. 50 कोटींची तर भाजप आमदार पांडुरंग मडकईकर यांची मालमत्ता रु. 32 कोटींची आहे.

सभापती राजेश पाटणेकर हे सत्ताधारी भाजप मधील सर्वात गरीब आमदार ठरतात. त्यांची मालमत्ता रु. सव्वा कोटींची. त्यानंतर जोशुआ डिसोझा यांची मालमत्ता रु. 1 कोटी 70 लाख, मंत्री गोविंद गावडे यांची मालमत्ता रु. 1 कोटी 21 लाख एवढी आहे.

भाजप आमदार व मंत्री विश्वजित राणे यांची रु. 21 कोटींची मालमत्ता व रु. 11 कोटींचे कर्ज त्यांच्यावर आहे. बाबूश मोन्सेरात यांची 21 कोटीची मालमत्ता व त्यांचे 10 कोटींचे कर्ज आहे तर मायकल लोबो यांच्यावरही रु. 10 कोटींचे कर्ज आहे.

आठवी ते बारावी पास असे 19 आमदार

राज्य विधानसभेत अद्याप 19 असे आमदार आहेत ज्यांनी आपली शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 8 ते 12 वी उत्तीर्ण अशी दाखविलेली आहे. हे प्रमाण 48 टक्के एवढे आहे. 16 आमदारांचे शिक्षण हे पदवी वा पदव्युत्तरपर्यंत झालेले आहे. हे प्रमाण 40 टक्के एवढे आहे. तर 5 आमदार हे डिप्लोमा होल्डर आहेत.

युवा मुख्यमंत्री विद्यमान विधानसभेतील 18 आमदारांचे वय हे 25 ते 50 च्या दरम्यान आहे. स्वतः मुख्यमंत्री हे देखील युवा असून ते 47 वर्षांचे आहेत. हे प्रमाण 48 टक्के एवढे आहे तर 22 आमदार (55 टक्के) यांचे वय हे 51 ते 82 वर्षापर्यंतचे आहे. 40 पैकी केवळ 2 आमदार या महिला आहेत हे प्रमाण केवळ 5 टक्के एवढेच आहे.

Related Stories

अभंग गायन स्पर्धेत राज्ञी फळदेसाई, साईराज गावडे प्रथम

Amit Kulkarni

समुद्रकिनाऱ्यावर 90 जणांना जेलीफिशचा दंश

Patil_p

कुवेतहून 137 भारतीय प्रवासी दाबोळीत दाखल

Omkar B

…तरच भाजपविरोधी आघाडीत सामील होणार

Amit Kulkarni

आमदार राजेश फळदेसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Omkar B

ऍबकस वेदिक गणित स्पर्धेत कनक बागकर व अत्रेय गवसचे यश

Patil_p