ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मनोज यादव यांच्यासह सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते राजीव राय, जैनेंद्र यादव, गजेंद्र सिंह यांच्यासह जवळपास 12 नेत्यांच्या निवासस्थानी आज सकाळी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली.
मैनपुरी येथे प्राप्तिकर विभागाच्या पथकाने पहाटे आरसीएल ग्रुपचे मालक आणि सपा नेते मनोज यादव यांच्या घरावर छापा टाकला. पोलिस पथकाने मनोज यादव यांच्या घराला घेराव घातला असून, प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजीव राय यांच्या मालमत्तांवरही सुरक्षा दलांनी पहारा दिला असून, अधिकारी चौकशी करत आहेत.
लखनौमधील आंबेडकर पार्क येथील जैनेंद्र यादव यांच्या निवासस्थानावरही धाड पडली आहे. तसेच गजेंद्र सिंग यांच्यासह सुमारे डझनभर नेत्यांच्या घरी चौकशी सुरू आहे. ही कारवाई राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोप सपाचे प्रवक्ते राय यांनी केला आहे. तसेच आम्ही समाजवादी लोक अशा कारवाईला घाबरणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.