Tarun Bharat

अखेर सर्वोदय कॉलनीतील घरांवर फिरविला जेसीबी

कारवाईला नागरिकांनी केला विरोध, मात्र पोलीस बळाचा वापर करत पाडली घरे

प्रतिनिधी / बेळगाव

हिंदवाडी-सर्वोदय कॉलनी येथील घरे महापालिकेने पाडली आहेत. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ही घरे हटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला तीव्र विरोध होत होता. तरीदेखील महापालिकेने पोलीस बंदोबस्तात अखेर ही घरे हटविली आहेत.

तेथील सार्वजनिक शौचालय तसेच इतर इमारती पाडण्यात आल्या आहेत. सदर जागा महापालिकेची असून त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या ही घरे बांधण्यात आली होती. त्यामुळे ती हटवून त्या ठिकाणी शाळा किंवा उद्यान निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी एकदा त्या ठिकाणी कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी गेले होते. मात्र त्याला तीव्र विरोध झाला होता.

येथील नागरिकांनी आम्ही बेघर होणार आहे, तेव्हा आम्हाला घरांची जागा आहे ती द्यावी, अशी मागणी केली होती. गुरुवारी महापालिकेच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर आणि इतर अधिकाऱयांनी सर्वोदय कॉलनी येथे जाऊन ही कारवाई केली आहे.

तातडीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन

सर्वोदय कॉलनी येथील घरे हटविल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्वोदय कॉलनीतील नागरिकांनी धाव घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून महापालिकेचा निषेध नेंदविला. येथे असलेले गणपती मंदिरही हटविण्यात आले आहे. तेव्हा आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे आम्ही जायचे कोठे? उच्च व सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन काळात कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे आदेश दिले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तेव्हा तातडीने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, सुनील जाधव, शाहीनी जमादार, आनंद वैद्य, जोतिबा पाटील, शीतल बिलावर, सीमा पाटील, उदय कोलकार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. 

Related Stories

शेतात गांजा पिकविणाऱयाला दहा वर्षे कारावास

Amit Kulkarni

सायकलवरून कणबर्गी-पंढरपूर वारी

Amit Kulkarni

आयटीआय प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरुवात

Amit Kulkarni

‘काश्मीर फाईल्स’ सुवर्ण मयुराच्या शर्यतीत

Amit Kulkarni

कोविडकाळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ

Amit Kulkarni

चक्क उन्हाळय़ात बरसला अवकाळी पाऊस

Omkar B