Tarun Bharat

अख्खा संघ गारद करण्याचा एजाझचा भीमपराक्रम!

एकाच डावात घेतले सर्व 10 बळी, जिम लेकर, अनिल कुंबळे यांच्या ‘परफेक्ट-10 क्लब’मध्ये दाखल

मुंबई / वृत्तसंस्था

मुंबईतील जन्म असणाऱया किवीज डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलने (10-69) येथील दुसऱया व शेवटच्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा अख्खा संघ गारद करत जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या डावात 10 बळी घेण्याच्या गोलंदाजांमध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. 144 वर्षांच्या कसोटी इतिहासात असा पराक्रम करणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला. मात्र, भारताने यानंतरही पहिल्या डावात सर्वबाद 325 धावांपर्यंत मजल मारली. शिवाय, न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 62 धावांमध्ये गुंडाळत या लढतीवर आपले एककलमी वर्चस्व प्रस्थापित केले. शनिवारी या सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱया डावात बिनबाद 69 धावांपर्यंत मजल मारली.

यापूर्वी, पहिल्या दिवसाच्या खेळात 4 बळी घेणाऱया एजाझने शनिवारी दुसऱया दिवशी भारतीय संघाचे उर्वरित 6 फलंदाजही बाद केले आणि डावात 10 बळी घेण्याचा भीमपराक्रम गाजवला. 34 वर्षीय एजाझने 47.5 षटकात 12 निर्धाव व 119 धावात 10 बळी, असे भेदक पृथक्करण नोंदवले. 33 वर्षीय पटेलसाठी ही केवळ 11 वी कसोटी असून यापूर्वी डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम त्याने केवळ दोनवेळा केला होता. येथील 4 स्वतंत्र स्पेलमध्ये त्याने 24-10-57-4, 5-0-16-0, 6-0-16-2, 12.5-2-30-4 असा मारा नोंदवला.  मात्र, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो न होतो, तोच न्यूझीलंडचा पहिला डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता ते अवघ्या 28.1 षटकात सर्वबाद 62 वर गडगडले.

भारतीय संघातर्फे रविचंद्रन अश्विन (8 षटकात 8 धावात 4 बळी), सिराज (4 षटकात 19 धावात 3 बळी) व अक्षर पटेल (9.1 षटकात 14 धावात 2 बळी) यांनी किवीज फलंदाजीला खिंडार पाडले. याशिवाय, जयंत यादवने 1 बळी घेतला. पहिल्या डावाअखेर 263 धावांची धमाकेदार आघाडी प्राप्त केल्यानंतर भारताने दुसऱया डावात बिनबाद 69 अशी आक्रमक सुरुवात केली. मयांक अगरवाल 75 चेंडूत 6 चौकारांसह 38 तर पुजारा 51 चेंडूत 29 धावांवर नाबाद राहिले.

धावफलक

भारत पहिला डाव ः मयांक अगरवाल झे. ब्लंडेल, गो. पटेल 150 (311 चेंडूत 17 चौकार, 4 षटकार), शुभमन गिल झे. टेलर, गो. पटेल 44 (71 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा त्रि. गो. पटेल 0 (5 चेंडू), विराट कोहली पायचीत गो. पटेल 0 (4 चेंडू), श्रेयस अय्यर झे. ब्लंडेल, गो. पटेल 18 (41 चेंडूत 3 चौकार), वृद्धिमान साहा पायचीत गो. पटेल 27 (62 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. पटेल 0 (1 चेंडू), अक्षर पटेल पायचीत गो. पटेल 52 (128 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), जयंत यादव झे. रविंद्र, गो. पटेल 12 (31 चेंडूत 2 चौकार), उमेश यादव नाबाद 0, मोहम्मद सिराज झे. रविंद्र, गो. पटेल 4. अवांतर 18. एकूण 109.5 षटकात सर्वबाद 325.

गडी बाद होण्याचा क्रम

1-80 (शुभमन, 27.3), 2-80 (पुजारा, 29.2), 3-80 (विराट, 29.6), 4-160 (श्रेयस, 47.4), 5-224 (साहा, 71.4), 6-224 (अश्विन, 71.5), 7-291 (मयांक, 99.5), 8-316 (अक्षर, 107.5), 9-321 (जयंत, 109.2), 10-325 (सिराज, 109.5). 

गोलंदाजी

टीम साऊदी 22-6-43-0, काईल जेमिसन 12-3-36-0, एजाझ पटेल 47.5-12-119-10, विल्यम सॉमरव्हिले 19-0-80-0, रचिन रविंद्र 4-0-20-0, डॅरेल मिशेल 5-3-9-0.

न्यूझीलंड पहिला डाव ः टॉम लॅथम झे. अय्यर, गो. सिराज 10 (14 चेंडूत 2 चौकार), विल यंग झे. कोहली, गो. सिराज 4 (9 चेंडूत 1 चौकार), डॅरेल मिशेल पायचीत गो. पटेल 8 (11 चेंडू), रॉस टेलर त्रि. गो. सिराज 1 (2 चेंडू), हेन्री निकोल्स त्रि. गो. अश्विन 7 (31 चेंडूत 1 चौकार), टॉम ब्लंडेल झे. पुजारा, गो. अश्विन 8 (24 चेंडूत 1 चौकार), रचिन रविंद्र झे. कोहली, गो. जयंत 4 (15 चेंडू), काईल जेमिसन झे. अय्यर, गो. पटेल 17 (36 चेंडूत 2 चौकार), टीम साऊदी झे. बदली खेळाडू (सुर्यकुमार), गो. अश्विन 0 (2 चेंडू), सॉमरव्हिले झे. सिराज, गो. अश्विन 0 (26 चेंडू), एजाझ पटेल नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 3. एकूण 28.1 षटकात सर्वबाद 62.

गडी बाद होण्याचा क्रम

1-10 (यंग, 3.1), 2-15 (लॅथम, 3.6), 3-17 (टेलर, 5.1), 4-27 (डॅरेल, 8.1), 5-31 (निकोल्स, 13.1), 6-38 (रचिन, 16.4), 7-53 (ब्लंडेल, 19.4), 8-53 (साऊदी, 19.6), 9-62 (सॉमरव्हिले, 27.5), 10-62 (जेमिसन, 28.1).

गोलंदाजी

उमेश यादव 5-2-7-0, सिराज 4-0-19-3, अक्षर पटेल 9.1-3-14-2, अश्विन 8-2-8-4, जयंत यादव 2-0-13-1.

भारत दुसरा डाव ः मयांक अगरवाल खेळत आहे 38 (75 चेंडूत 6 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 29 (51 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 2. एकूण 21 षटकात बिनबाद 69.

गोलंदाजी

टीम साऊदी 5-0-14-0, एजाझ पटेल 9-1-35-0, काईल जेमिसन 4-2-5-0, विल्यम सॉमरव्हिले 2-0-9-0, रचिन रविंद्र 1-0-4-0.

कोट्स

परफेक्ट-10 च्या क्लबमध्ये मी एजाझ पटेलचे मनापासून स्वागत करतो. कसोटी सामन्याच्या पहिल्या व दुसऱया दिवशी त्याची भेदक गोलंदाजी विशेष लक्षवेधी होती.

-माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे

क्रिकेटमधील सर्वात कठीण मानला जाणारा पराक्रम एजाझ पटेलने गाजवला आहे. या पराक्रमाबद्दल त्याचे खास अभिनंदन. एकाच डावात अख्खा संघ गारद करणे ही केव्हाही सर्वोत्तम कामगिरी ठरते.

-भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री

मागील 15 वर्षांच्या कालावधीत समालोचन करताना मी किवीज संघाच्या काही अविस्मरणीय खेळी पाहिल्या आहेत आणि त्यात एजाझच्या या 10 बळींच्या माईलस्टोनचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल.

-माजी किवीज गोलंदाज सायमन डॉल

जेव्हा त्रिफळाचीत असतानाही अश्विनने अजाणतेपणाने डीआरएस घेतला!

एजाझ पटेलने भारताच्या डावात 10 बळी घेतले, त्यात रविचंद्रन अश्विनला बाद करणारा त्याचा चेंडू सर्वोत्तम ठरला. अगदी किंचीत स्पिन झालेल्या चेंडूवर अश्विनचा अंदाज सपशेल चुकला आणि ऑफ स्टम्पवरील बेल्स उडाली. मात्र, यष्टीमागे झेलबादचे अपील झाल्याचे समजून अश्विनने यावर डीआरएस घेतला होता. नंतर आपण त्रिफळाचीत झाल्याचे नजरेस आल्यानंतर अश्विनने रिप्लेची प्रतीक्षा न करता तंबूचा रस्ता धरला.  

असे घेतले एजाझने 10 बळी

1 ः शुभमन स्लीपमधील टेलरकरवी झेलबाद

2 ः लेगवरुन ऑफवर वळलेल्या चेंडूवर पुजारा त्रिफळाचीत

3 ः रिव्हय़ू घेतल्यानंतरही कोहली पायचीत

4 ः श्रेयस अय्यर यष्टीमागे ब्लंडेलकरवी झेलबाद

5 ः कट करण्याच्या प्रयत्नात साहा पायचीत

6 ः फॉरवर्ड डिफेंड करण्याच्या प्रयत्नात अश्विन त्रिफळाचीत

7 ः बॅकफूटवर फटका चुकल्यानंतर मयांक ब्लंडेलकरवी झेलबाद

8 ः ऑफ स्टम्पवरील चेंडूवर अक्षर पटेल पायचीत

9 ः लाँगऑफवरील रचिनकरवी जयंत यादव झेलबाद

10 ः सिराज रचिनकरवी झेलबाद, एजाझचे डावात 10 बळी!

बॉक्स

भारतीय भूमीत विदेशी संघाची निचांकी धावसंख्या

धावसंख्या / संघ / षटके / प्रतिस्पर्धी / ठिकाण / तारीख

62 / न्यूझीलंड / 28.1 / भारत / मुंबई / 3 डिसेंबर 2021

79 / द. आफ्रिका / 33.1 / भारत / नागपूर / 25 नोव्हेंबर 2015

82 / श्रीलंका / 51.5 / भारत / चंदिगढ / 23 नोव्हेंबर 1990

93 / ऑस्ट्रेलिया / 30.5 / भारत / मुंबई / 3 नोव्हेंबर 2004

103 / अफगाण / 38.4 / भारत / बेंगळूर / 14 जुन 2018

एजाझचे परफेक्ट-10, तरीही सर्वबाद 62 मुळे न्यूझीलंड बॅकफूटवर!

डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलने डावात 10 बळी घेण्याचा विक्रम गाजवला असला तरी भारताच्या सर्वबाद 325 धावांना प्रत्युत्तर देताना किवीज संघाचा डाव सर्वबाद 62 धावांमध्येच खुर्दा झाला आणि यामुळे ते बॅकफूटवर फेकले गेले. दिवसअखेर भारताने बिनबाद 69 धावांची मजल मारत या लढतीत आपली एकत्रित आघाडी 332 धावांवर नेली आहे.

एजाझचे कुटुंबिय मूळचे मुंबईतील जोगेश्वरीचे!

एजाझच्या कुटुंबियांचे मुंबईतील जोगेश्वरमध्ये स्वतःचे घर असून त्याची आई ओशिवारा येथे शिकवत असे तर वडील रेफ्रिजरेशन व्यवसायात होते. 1996 मध्ये एजाझ कुटुंबियांनी न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

बीसीसीआय-विवो यांच्यातील करार रद्द

Patil_p

ब्रुनो फर्नांडिस चौथ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

भारताचे आठ बॉक्सर्स सुवर्णपदकाच्या फेरीत

Patil_p

पहिला वनडे सामना वाया

Patil_p

अचंता शरथ कमलचे खेलरत्नसाठी नामांकन

Patil_p

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर पाच गडय़ांनी विजय

Patil_p