Tarun Bharat

अग्नि प्रदीपन

Advertisements

दिवाळी आली की पूर्वी गुलाबी थंडी, धुकं आणि व्यायाम, फिरणे यांची चाहूल लागत असे. हिवाळय़ातील व्यायाम आरोग्यासाठी उत्तम असतो. ओघानेच माणसं आरोग्य श्रीमंतीसाठी जमेल तसे व झेपेल तसे व्यायाम करताना दिसत. या काळात शरीरातील अग्निही प्रदिपीत झालेला असतो. ओघाने भूख चांगली लागते. नवरात्र, दसरा, दिवाळी असा सण उत्सवांचा कालखंड आनंदाचा, मेजवानीचा आणि सुखाचा असतो. थोडक्यात अच्छे दिन असतात. पण माणसं बदलतं चालली आहेत. चंगळवाद बोकाळला आहे. श्रम कमी आणि खाद्य जादा असा कारभार आहे. शारीरिक वजने वाढत आहेत. शालेय मुले-मुली प्राथमिक शाळेतच गलेलठ्ठ होताना दिसत आहेत. पिझ्झा, बर्गर, जंकफूड, मांसाहार यावर भर दिला जातो आहे. एकूणच देश व माणसे आरोग्यदृष्टय़ा गरीब होत आहेत. भारत हा लवकरच मधुमेहाची जागतिक राजधानी होईल. आजच शंभरात आठ जणांना मधुमेह असल्याचे दिसून आले आहे. चंगळवाद आणि व्यसनी माणसे फार प्रगती करु शकत नाहीत हे वेगळे सांगायला नको. जगभरातल्या तथाकथित प्रगत देशातली जी आरोग्य दुरवस्था आहे ती आपल्या देशातही वेगाने येते आहे. सहज गावात नजर टाकली तर मोठ-मोठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आणि पावलोपावली औषधांची दुकाने आणि मोबाईलच्या शोरुम खचाखच दिसत आहेत. मैदाने मोकळी, तालिमी-व्यायामशाळा ओस आणि धाबे, बार ओसंडणारे हे चित्र शोभादायक नाही. केवळ नोटांच्या मागे लागलेला आणि स्क्रीनसमोर रोज तीन-चार जीबी डाटा खर्च करणारा समाज फार मोठे भविष्य घेऊन पुढे जात नाही हे वेगळे सांगायला नको पर्यावरण आणि आरोग्यरक्षण हे विषय आर्थिक, भौतिक, समृद्धी इतकेच महत्त्वाचे आहेत. यांचे भान बाळगले पाहिजे. नियमित व्यायाम करून थोडा तरी घाम गाळला पाहिजे. घामातूनच मोती पिकतात. याचा विसर महाग ठरु शकतो. या काळात साखर उद्योगाचाही अग्नि प्रदिपीत होतो. खरीप हंगाम संपून दिवाळीचे दिवस सुरु झाले की शेतकऱयांना, राजकारण्यांना ऊस गळीत हंगामाचे वेध लागतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात, ऊस पीक, साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. देशात जितके साखर कारखाने आहेत त्यातील निम्याहून अधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आणि त्यातील बहुतांश या परिसरात आहेत. ओघानेच या परिसराची अर्थव्यवस्था साखर उद्योगाशी निगडीत आहे. एखादा साखर कारखाना आजारी पडला, बंद पडला तर त्या परिसराची काय अवस्था होते हे सर्वांना माहित आहे. कारखान्याच्या दारातील चहाची टपरी, पानपट्टीपासून टायर विक्री, वाहतूक, पेट्रोल, बँका, बाजारपेठा, वाहने सगळय़ा गोष्टींना फटका बसतो आणि तो परिसर मागे पडतो. याच जोडीला सहकारातील राजकारणातल्या अपप्रवृत्ती यांचे कारनामे सुरु होतात. बँकांची कर्जे, व्याजमाफी करुन संबंधित सहकार दांडगे हे आजारी उद्योग घशात घालतात. ऊस उत्पादक शेतकरी हात हालवत नेत्यामागे फरफटतांना दिसतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. उसाला चांगला दर हवा, कामगारांना चांगले वेतन हवे. संचालक मंडळ आणि नेत्यांना हात मारता आला पाहिजे. सरकारला कर मिळाला पाहिजे. ग्राहकांना स्वस्त साखर पाहिजे, असे सर्व बाजूंनी या उद्योगाला ताण आहेत. यावर उपाय आहे पण तो करण्याची तयारी हवी. एक तर भ्रष्टाचार समूळ उखडला पाहिजे. राजकारण आणि सहकार यांचे संबंध तोडले पाहिजेत आणि साखर कारखान्यांनी उसाचे क्षेत्र वाढवण्याऐवजी एकरी ऊस उत्पादन वाढवले पाहिजे. उतारा वाढवला पाहिजे. उपपदार्थ निर्मिती, ऊर्जा निर्मिती यावर भर दिला पाहिजे. राज्यात आज शेजारी-शेजारी असलेल्या काही शेतात एकाकडे एकरी 28 टन ऊस पिकतो तर शेजारी एकरी 128 टन पिकतो. सरासरी साठ टन ऊस निघाला तरी बळीराजा समाधानी असतो. पण आता निसर्ग बदलला आहे. किड, रोग यांचे प्रमाण वाढले आहे. हुमणी, मावा यांचा प्रादुर्भाव शेतकऱयांचे लाखाचे बारा हजार करत आहेत. पाऊस अनियमित आहे. वीज, खते, औषधे, रोजगार यांचे चढे दर एफआरपी वाढला असला तरी शेतकऱयांचे कंबरडे मोडताना दिसत आहे. त्यातच काटामारी आणि उसाची तोड हे विषय गेली काही वर्षे नव्याने पुढे आले आहेत. शासनाचे वजन व काटा अधिकारी असतात पण ते मालामाल होतात आणि शेतकरी वजनात फसवला जातो. उसाची तोड येण्यासाठी त्याला आता अतिरिक्त खर्च करावा लागतो. शेतकऱयांचे कैवारी, बळीराजाचे सुपुत्र वगैरे स्वतःला संबोधणारे मालामाल होताना आणि बळीराजा कंगाल होताना दिसत आहे. दिवाळी दरम्यान गळीत हंगाम सुरु होतो. यंदा भरपूर ऊस आहे. शिल्लक राहिल अशी भीती आहे. पाऊस लांबल्याने हंगामही थोडा लांबला आहे. पंधरा तारखेला गाळप सुरु होईल पण आता जागोजागी बॉयलर प्रदीपनाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. हे प्रदीपन म्हणजे लक्ष्मीपूजनच असते पण त्यापलीकडे जाऊन या उद्योगाकडे त्यातील घटकांकडे बघितले पाहिजे. दरवर्षी दिवाळीत रस्त्यावर टायर पेटवून आणि ट्रक्टर पंक्चर करुन आंदोलन होणार असेल तर ते प्रशासनाचे व संबंधित घटकाचे अपयश मानले पाहिजे. सरकारने एफआरपी जाहीर करत तो एकरकमी द्या असे म्हटलेय. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत वगैरे शेतकरी नेते आता प्रस्थापित झाले आहेत. शेट्टी यांनी काटेमारीतून साडेचार हजार कोटीची लूट कारखानदार करतात असे म्हटलय. पण ही व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. यंदाचा गळीत हंगाम सुरु होईल, आंदोलन होईल, तोडणीसाठी हात ओले करावे लागतील, तुकडय़ा-तुकडय़ांनी पैसे मिळतील आणि काटाही मारला जाईल हे सांगायला नको. प्रत्येकाला आपली दुकाने चालवायची आहेत. मुळ विषय घेऊन काम करणारे साखर सम्राट, शेतकरी नेते, राज्यकर्ते कुणी नाही. अन्यथः एकरी 80 ते 90 टन ऊस उत्पादन,13 टक्के साखर उतारा असा यशस्वी कारभार झाला तर हा उद्योग पुन्हा बहरेल. खत, औषधे यांची निर्मिती, उसाचे उपपदार्थ यातही गती घेतली पाहिजे. चांगली पाऊले टाकली पाहिजेत. यंदाचा बॉयलर प्रदीपन त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व्हावा आणि माणसे आर्थिक व आरोग्य श्रीमंत व्हावीत. साखर उद्योग, शेती बहरावी तीच अग्नि प्रदीपनाची सार्थक पूजा ठरेल.

Related Stories

…ही प्रथा पूर्वापार चालू

Patil_p

निखळ गुणवत्तेचे निर्भेळ यश !

Patil_p

कोरोना योद्धय़ांना हवे जनतेचे पाठबळ

Patil_p

व्यवस्थापकीय कौशल्य संवर्धन करणे गरजेचे

Patil_p

भारतीय स्टार्टअप्सची प्रगतीशील वाटचाल

Patil_p

मराठी माणूस आणि भैय्ये

Patil_p
error: Content is protected !!