Tarun Bharat

‘अजिंक्यतारा’ कोण सर करणार

महाराष्ट्र केसरी किताबासाठी दिग्गज मल्ल आखाडय़ात

फिरोज मुलाणी / औंध :

उन्हाचा पारा वाढल्याने तापमान कमालीचे वाढले असले तरी सातारला कुस्तीच्या आखाडय़ातील वातावरण तापले आहे. 64 राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताबाची गदा खांद्यावर घेण्यासाठी राज्यातील अव्वल दर्जाचे मल्ल आखाडय़ात उतरले आहेत. मानाचा किताब जिंकून सातारचा अजिंक्यतारा कोण सर करणार?याचीच उत्सुकता तमाम कुस्तीशौकिनांना लागली आहे.
64 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस आता काही तास उरले आहेत. दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विविध गटात ही स्पर्धा होत असली तरी कुस्तीशौकिनांचे लक्ष खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी गटातील लढतीकडे असते. अव्वल दर्जाचे तुफानी मल्ल महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढतात. अतिशय चुरशीच्या लढतीचा रंगतदार थरार पहायला मिळत असल्याने कुस्तीशौकिनां देखील या स्पर्धेची आस लागलेली असते. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे कुस्ती स्पर्धा झाली नाही त्यामुळे यंदा सातारला होणाया स्पर्धेला कुस्तीशौकिनांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळेल अशी सध्या कुस्तीक्षेत्रात चर्चा सुरू आहे.

जिल्हा निवड चाचणीतून विविध जिह्यातील मल्ल महाराष्ट्र केसरी गटात प्रतिनिधित्व करणार आहेत.
2018 सालचा महाराष्ट्र केसरी विजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदा देखील गादी गटातून उतरणार आहे. राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आपण भरात असल्याचे त्याने सिध्द केले आहे. डबल महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न घेऊन आखाडय़ात उतरणारा सदगीर दमाने भारी आहे शिवाय अनेक डावाची अस्त्रs त्याच्या भात्यात आहेत. निर्णायक क्षणी बाजी मारण्यात तरबेज असलेल्या सदगीरवर यंदा देखील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाची धुरा आहे. सदगीरचा विजयी वारु रोखणे प्रतिस्पर्ध्या समोरचे तगडे आव्हान आहे. बुलढाण्याचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी लढणार आहे. जय पराजयाची पर्वा नसलेला बालाची धक्कादायक निकालाची ख्याती आहे. अलीकडे नवीन मल्लांनी मैदानी कुस्तीत त्याला वरचढ ठरुन दिलेले नाही. स्पर्धेत नवीन डावपेच घेऊन बालारफिकला चमत्कार घडवावा लागेल.

मूळचा पुण्याचा मात्र मुंबई जिल्ह्याकडून आखाडय़ात उतरलेला बिलवा मल्ल आदर्श गुंड स्पर्धेत धोकादायक ठरू शकतो. उंचीने कमी असला तरी वजनाने भारी आहे भारंदाज धोबीपछाड सारख्या डावावर हुकुमत असलेल्या आदर्शने झी कुस्ती दंगल मध्ये धक्कादायक विजय मिळवून खळबळ उडवून दिली होती. नव्या दमाचा पुण्याचा तगडा मल्ल महारुद्र काळेल कुठपर्यंत मजल मारणार हे स्पर्धेतील कामगिरी वरुन निश्चित होईल. प्रदिर्घ अनुभव असलेला जालन्याचा उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी यंदा नव्याने मैदानात उतरला आहे. नव्या दमाच्या मल्लाचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे. सोलापूरचाच जुना मल्ल प्रतिस्पर्ध्याला दमवून निर्णायक विजय मिळवणारा गणेश जगताप तयारीनिशी नशीब अजमावणार आहे.

दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानी कुस्तीत विजयी घौडदौड चालू असलेला भारत मदने याने (मुंबई शहर) प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान उभे करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उडी घेतली आहे. धक्कादायक निकालाची त्याची ख्याती आहे. (मुंबई शहर पश्चिम) चे प्रतिनिधित्व करणारा अक्षय गरुड घराण्याला गदा मिळवून देण्यासाठी स्पर्धेत उतरला आहे. सर्वच बाबतीत तो सरस आहे पुणेकरांच्या मोठय़ा अपेक्षा त्याच्या खांद्यावर आहेत.मूळचे सोलापरचे मात्र मुंबई शहराकडून महाराष्ट्र केसरी साठी यंदा देखील अनुभवी समाधान पाटील, दत्ता नरळे नशीब अजमावणार आहेत.रत्नागिरीचा लढवय्या संतोष दोरवड दुखापतीतून बरा झाल्यावर माती गटातून लढणार आहे. अनुभवी असल्याने त्याच्या कामगिरीकडे सोलापूरच्या नजरा लागल्या आहेत. मैदानी कुस्तीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील दिग्गज मल्लांना पराभवाची धूळ चारणारा कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेला तगडा मल्ल सिंकदर शेख वाशीम जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मैदानी कुस्तीत विजयी घौडदौड सुरू असलेला सिकंदर गदा जिंकण्याच्या इराद्याने यंदा उतरला आहे. तो धाडसी आणि लढवय्या आहे. त्याचे तगडे आव्हान स्पर्धेत असणार आहे. मात्र मैदानी कुस्ती आणि स्पर्धेच्या कुस्तीतील लढण्याचे तंत्र आणि डावपेच वेगवेगळे आहेत दोन्हीचा मेळ घालून सिकंदर लढल्यास प्रतिस्पर्ध्याला त्याला रोखणे अवघड होईल. सातारा जिह्यातील इंदोलीचा नयनेश निकम वाशिमकडून महाराष्ट्र केसरीची परीक्षा देणार आहे. जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांचे त्याच्या कामगिरीकडे डोळे लागले.

कुस्तीपंढरीला चमत्काराची उत्कंठा

कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापूरला मानाची गदा वाकुल्या दाखवीत आहे. कौतुक डाफळे वजनगटात हलका असला अनुभवाने भारी आहे. अनेक लढतीत पराजयाचे विजयात रुपांतर करण्याची क्षमता त्याच्या अंगी आहे. राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे त्याच्या कडून मोठय़ा अपेक्षा आहेत. अनेक वर्षे कौतुक महाराष्ट्र केसरी गटात झुंज देत आहे मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे.2018 साली सैन्यदलातील संग्राम पाटील याने उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यंदा त्याच्या कामगिरीवर कोल्हापूरकर लक्ष ठेवून आहेत. जागतिक पदक विजेता सैन्यदलातील धडाकेबाज मल्ल पृथ्वीराज पाटील धक्कादायक निकाल लावण्यात पटाईत आहेत. यंदा आखाडय़ात चमत्कार घडवतोय का याची कुस्तीपंढरीला उत्कंठा लागली आहे. विद्यापीठ पदक विजेता शुभम सिदनाळे वजन उंचीने भारी आहे. मोठा पल्ला गाठायची त्याच्याकडे क्षमता आहे. इचलकरंजीकर ढाकवाले मामा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
पुणे शहरातून बलदंड ताकदीचा पृथ्वीराज मोहोळ आणि हर्षद कोकाटे नवखी जोडी मैदानात उतरली आहे. कुठलाही दबाव नसल्याने चांगल्या कामगिरीची पुणेकरांना त्यांच्या कडून अपेक्षा आहे.

होमग्राऊंडवर साताऱ्याला गादीची प्रतीक्षा

सातारला दोन दशकापासून गदेची प्रतिक्षा लागली आहे. भुगावला गदेने हुलकावणी दिली असली तरी यंदा होमग्राऊंडवर सातारला गदा मिळवून देण्यासाठी तुफानी ताकदीचा मोहिचा सुपुत्र किरण भगत माती गटातून उतरला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ही त्याची पहिलीच स्पर्धा आहे. त्याच्या कामगिरीवर सगळेच लक्ष ठेवून आहेत. मोठा अनुभव असल्याने स्पर्धेत त्याचे तगडे आव्हान निश्चित असणार आहे. गादी गटात मात्र नवख्या दिग्विजय जाधववर जिल्ह्याची मदार आहे.

Related Stories

अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी…

Rohit Salunke

…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंचं खळबळजनक विधान

Archana Banage

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा: आशिष शेलार

Archana Banage

सातारा : आता योग्य व्यक्ती “ग्रामपंचायतीचा प्रशासक”

Archana Banage

सातारा नगरपालिका आणि झेडपी कोरोनाच्या विळख्यात

Archana Banage

अधिवेशन पुढे ढकल्याने सचिन सावंतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले…

Archana Banage