मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना निवेदन दिले आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत 25 जून रोजी मांडण्यात आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


previous post