Tarun Bharat

अटलबिहारी वाजपेयीचा भाजपला विसर पडू लागलाय- चिदंबरम

प्रतिनिधी/ मडगाव

देशात गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले असा सवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार उपस्थितीत करतात. मात्र, या 70 वर्षात भाजपचे आदरणीय नेते अटलबिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते. तसेच मोरारजी देसाई, श्री. चंद्रशेखर सारखे नेते प्रधानमंत्री होऊन गेले याचा विसर देखील नरेंद्र मोदीना पडू लागला आहे व तो दुर्दैवी प्रकार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा गोवा विधानसभा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काल मडगावात केली.

मडगाव गट काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या सभेत पी. चिदंबरम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने केवळ जाती-धर्माचे राजकारण देशात केले. अशा पद्धतीचे राजकारण हे देशासाठी मारक आहे. काँग्रेस पक्षाने कधीच जाती-धर्माच्या राजकारणाला प्राधान्य दिले नाही. म्हणूनच काँग्रेसच्या राजवटीत देशाचा भरीव विकास झाल्याचे पी. चिदंबरम म्हणाले.

देश विकायला काढलाय

काँग्रेस पक्षाने देशात साधन-सुविधा निर्माण केल्या. अनेक प्रकल्प आणले, सरकारची स्वताची अशी मालमत्ता निर्माण केली. मात्र, आज भाजप सरकारने ही मालमत्ता विक्रीला काढल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला. जर काँग्रेस पक्षाने काहीच निर्माण केले नसते आज भाजपला विक्री करण्यासाठी काहीच मिळाले नसते. देशाची मालमत्ता विक्रीला काढणे हा अत्यंत दूर्दैवी प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात होणारी आगामी विधानसभा ही काँग्रेस पक्षासाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत पक्षाने 40 ही मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत बुथ समित्यांना महत्वाची कामगिरी पार पाडावी लागणार असल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले. बुथ समित्याच मतदारसंघातील उमेदवार कोण असावा व त्याला कशा पद्धतीने विजयी करता येईल यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुथ समित्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार नक्की केले जातील असे त्यांनी सांगितले.

या सभेच्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पक्षाचे निरीक्षक प्रकाश राठोड, पक्षाचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक, सेवा दलाचे अध्यक्ष शंकर किर्लपालकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ तसेच काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

मडगावची जनता हाच आपल्या पाठीचा कणा

मडगावची जनता हाच आपल्या पाठीचा कणा आहे. या जनतेच्या बळावरच आपण दर वेळी निवडणुकीत विजय संपादन केलाय. आपल्या चांगल्या तसेच वाईट प्रसंगावेळी मडगावची जनता आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आपल्या विरोधात जेव्हा भाजपने मोहीम उघडली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे बरेच नेते दूर राहिले. मात्र, माजी खा. स्व. शांताराम नाईक व गिरीश चोडणकर हे देखील भक्कमपणे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले असे दिगंबर कामत म्हणाले.

गोव्यातील गरीब जनता आज त्रास पडलेली आहे. गरीब लोकांच्या हातात पैसा नाही. मात्र, जेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी गरीबांच्या हाती पैसा होता. कोणावर वाईट परिस्थिती आली नव्हती. मोटारसायकल पायलट, खाजेकार, चणेकार, फुलकार याचे जीवन सुखी होते. मात्र, भाजप सरकारने या लोकांवर बिकट परिस्थिती आणल्याचे टीका श्री. कामत यांनी केली.

आज संपूर्ण गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा नको असल्याचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेस सरकारच्या पाच वर्षाची कामगिरी आणि भाजपच्या दहा वर्षाची कामगिरीची तुलना आत्ता जनता करू लागली आहे. 2022 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल असे श्री. कामत म्हणाले.

भाजपला धमक असल्यास खाण घोटाळय़ाची चौकशी करा

गोव्यात 350 कोटीचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला. या घोटाळय़ाला दिगंबर कामत हे जबाबदार असल्याची टीका केली. या कथित खाण घोटाळय़ाचे कारण पुढे करून दिगंबर कामत यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सतावण्यात आले. त्यांना मानसिक त्रास दिला. पण, जेव्हा याच कथित घोटाळय़ाची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाकडे माहिती हक्क कायदय़ाखाली मागितली तेव्हा गोव्यात असा घोटाळा झाला नसल्याचे उत्तर देण्यात आले. भाजपला धमक असल्यास त्यांनी या घोटाळय़ाची चौकशी करावी असे जाहीर आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी दिले.

भाजपने माध्यम प्रश्नावरून देखील जनतेची दिशाभूल केली. सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाचेच धोरण पुढे नेले. माध्यम प्रश्ऩावरून देवदैवतांना गाऱहाणी घातली व देवांना फसविण्यात आले. या देवांकडे भाजपने चूक मागणे आवश्यक आहे अशी टीका श्री. चोडणकर यांनी केली.

सुरवातीला गोपाळ नाईक यांनी स्वागत केले तर एम. के. शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सभेला मोठय़ा संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती.

Related Stories

दिंडी महोत्सव हे मडगावचे भूषण : कामत

Amit Kulkarni

शेळ-मेळावली ग्रामस्थांच्या आंदोलनाला कलाटणी

Amit Kulkarni

दिल्ली एफसीचा 5-1 गोलानी पराभव करून एफसी गोवा उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

श्रीपादभाऊंची प्रकृती स्थीर

Omkar B

पणजीत झाली जणू ढगफुटीच

Amit Kulkarni

चला लागा निवडणुकीच्या कामाला

Amit Kulkarni