रामदुर्गमधून श्रीकांत ढवण तर विणकर संघातून कृष्णा अनगोळ विजयी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेची तीन जागांसाठी निवडणूक झाली. खानापूर तालुक्मयातील निवडणुकीकडे साऱयांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत अरविंद पाटील यांनी 27 मते घेवून आमदार अंजली निंबाळकर यांच्या विरोधात निसटता विजय मिळविला आहे. अंजली निंबाळकर यांना 25 मते मिळाली आहेत. दोन मतांनी अरविंद पाटील हे विजय झाले आहेत.


रामदुर्ग कृषी पत्तीन सोसायटीमधून श्रीकांत ढवण हे 16 मते घेवून विजयी झाले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी भीमाप्पा शिवाप्पा बेळवंकी यांना 13 मते मिळाली आहेत. विणकर सहकार संघातूनही दोन जण रिंगणात उतरले होते. यामध्ये कृष्णा रामलिंग अनगोळकर यांनी विजय मिळविला आहे. त्यांना 55 मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी गजानन निंगाप्पा कोळी यांना 38 मते पडली आहेत.
शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून बी. के. मॉडेल येथे मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपारी 1 पर्यंतच जवळपास 90 टक्के मतदान झाले होते. दुपारी 4 पर्यंत मतदानाची वेळ होती. त्यानंतर मतमोजणी झाली. काही वेळातच निकाल बाहेर पडले. त्यामध्ये माजी आमदार अरविंद पाटील दोन मतांनी अंजली निंबाळकर यांच्यावर विजय मिळविला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. त्या पाठोपाठ इतर दोन जागांचा निकाल बाहेर पडला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
सकाळपासूनच बी. के. मॉडेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदारांना व उमेदवारांव्यक्तीरीक्त इतर कोणालाही आत प्रवेश दिला नाही. मतदार वाहनांतून मतदान केंद्राकडे येत होते. ग्लोब थिएटरसमोरच बॅरीकेडस् लावून वाहने अडविण्यात आली होती. त्यानंतर मतदारांना ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात येत होते. एकूणच ही निवडणूक चुरशीने पार पडली. या निकालानंतर भाजपच्या नेते मंडळींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जिह्याचे राजकारण ठरविणाऱया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. मात्र तीन जागांसाठी ही निवडणूक झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 जागांपैकी 13 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर तीन जागा देखील बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्यामुळे शुक्रवारी निवडणूक घ्यावी लागली.