Tarun Bharat

अतिक्रिकेटचे ‘बळी’

Advertisements

विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱया टीम इंडियाला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागल्याने आयपीएलसह अतिक्रिकेटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार कपिल देव, सुनील गावसकर, मदनलाल यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय संघ व बीसीसीआयला सुनावलेले खडे बोल हे समयोचितच म्हणावे लागतील. त्यातून बोध घेऊन भविष्यात संघ वाटचाल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल. वास्तविक अजीर्ण होईल इतके क्रिकेट भारतीय संघ गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने खेळत आहे. किंबहुना, कागदावर बलवान वाटणाऱया या संघाने पाकिस्तान व न्यूझिलंडविरोधात ज्या पद्धतीने नांगी टाकली, ते पाहता संघनिवडीपासून ते मानसिक कणखरतेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण कमी पडलो, हे मान्य करायला हवे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरूद्धच्या दोन्ही सामन्यात संघ शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळय़ांवर थकलेला पहायला मिळाला. कोणत्याही टीमसाठी संघनिवड हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मात्र, तिथूनच त्रुटींना सुरुवात झाली. जायबंदी हार्दिक पंडय़ाला खेळविणे, ही घोडचूकच. गोलंदाजी करणे शक्य नसतानाही त्याला कोणत्या बेसवर खेळविण्यात आले, असा प्रश्न पडतो. चार नंबरवर कोण खेळणार, हा प्रश्न तर शेवटपर्यंत सोडविता आला नाही. सूर्यकुमार किंवा इशानपेक्षा आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या प्रेश ऋतुराज गायकवाडला संघात संधी दिली असती, तर ते अधिक उपयुक्त ठरले असते. त्यात अश्विनऐवजी वरुण चक्रवर्तीला खेळवून काय साधले, हे कळायला मार्ग नाही. आता कपिल देव यांनीच याबाबत ताशेरे ओढले, हे बरे झाले. आयपीएलपेक्षा देशहित जपा, असे त्यांनी स्पष्टपणे नोंदविलेले मत हे चिंतनीय ठरावे. आयपीएल ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानली जाते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना संधी मिळाली, हे खरेच. परंतु, खेळाडू आता मनाने या स्पर्धेकडेच अधिक झुकलेले दिसतात. आयपीएलनंतर लगेचच दोन दिवसांत विश्वचषकाला सुरुवात झाली. त्यामुळे पुरेशी तयारी वा डावपेचालाही संघाला अवधी मिळू शकला नाही. विश्वकरंडकाच्या आधी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळायला हवी होती. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन संघांची प्रगती झाली कारण ते विश्वकरंडाकाआधी जास्त क्रिकेट खेळले नाहीत. त्यामुळे त्यांचे खेळाडू ताजेतवाने राहिले. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली, याकडे माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल यांनी लक्ष वेधले आहे. ते रास्तच होय. सतत जैवसुरक्षित वातावरणात राहून खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम झाला. तसेच  भारतीय संघ हा मानसिकदृष्टय़ाही खूप थकलेला दिसत असल्याचे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी बोलून दाखविले. तर दस्तुरखुद्द भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी भारतीय खेळाडू शारिरीक आणि मानसिकदृष्टय़ा थकले असल्याची कबुली दिली आहे. स्वाभाविकच आयपीएलचा धमाका, दमलेले खेळाडू, तंदुरुस्ती येथेच गाडी येऊन थांबते. म्हणूनच आयपीएल की देश, हा माजी खेळाडूंनी उपस्थित केलेला प्रश्न यथोचित होय. पुढील काळात बीसीसीआयनेही कार्यक्रम आखताना खबरदारी घेतली पाहिजे. दोन स्पर्धांमध्ये पुरेसा अवधी कसा राखता येईल, हे पहायला हवे. आयपीएलमधूनही अतिशय गुणवान व चांगले खेळाडू आपल्याला मिळाले, यात दुमत नाही. पण, अशा मोठय़ा स्पर्धांआधी आयपीएल असेल, तर स्पर्धा खेळायची की नाही, हे खेळाडूंनी ठरविले पाहिजे. कारण, आयपीएल खेळणे, हे काही सक्तीचे नव्हते. आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा हा आम्हालाही झाला, असे मत न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊथी यानेही व्यक्त केले आहे. आयपीएलचा फायदा हा आपल्या खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंना जास्त होताना दिसून येतो. अशा स्पर्धा म्हणजे पैसा कमावण्याचे उत्तम साधन आहे. पैशाच्या लालसेपोटी आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे खेळाडू दुर्लक्ष करतात. अशावेळी देशहित मागे राहून प्रँचाईजी लीग खेळण्याकडे खेळाडूंचा कल असतो. अशा स्पर्धांसाठी खेळाडू आपली दुखापतही लपवून खेळतात. संघासाठी खेळायची वेळ येते, तेव्हा खेळाडूंच्या दुखापती डोके वर काढायला सुरुवात करतात. 2022 मध्ये आयपीएलमध्ये दोन संघ वाढल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे यापासून धडा घेऊन भारतीय संघाने दुसरी फळीही तयार करण्यावर भर द्यावा. पाकिस्तान, न्यूझीलंड यांच्याविरोधात पुरेशा धावा न केल्याने भारताचा पराभव झाला, हे भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केलेले मतही विचारात घ्यायला हवे. या दोन संघांविरुद्ध पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळ करण्याचे धाडसच भारतीय संघाने दाखविले नाही. टी-20 मध्ये पॉवरप्लेची पहिली सहा षटके महत्त्वाची असतात. म्हणूनच पॉवरप्लेमध्ये खेळण्याच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. पॉवरप्लेमध्ये पुरेशा धावा करता आल्या पाहिजेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताची आक्रमकताच दिसली नाही. न्यूझीलंडविरुद्ध स्वतः विराट कोहली चार नंबरवर खेळायला आला, त्याचा नंबर बदलून त्याने फलंदाजी केली. तर स्वतःऐवजी रोहित शर्माला तीन नंबरवर खेळायला पाठविले. हे सर्वच अनाकलनीय. त्याऐवजी राहुल चार नंबरवर खेळू शकला असता. कर्णधार विराट कोहली आणि शास्त्राr कंपनीला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही, हे तसे त्यांचे अपयशच. विराट व रोहित यांच्यातील मतभेदानेही संघातील संतुलन बिघडत गेले, असे म्हणण्यासही वाव आहे. आता मागच्या चुका टाळाव्या लागतील. 2022 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. हे दोन विश्वचषक जिंकायचे असतील, तर आत्तापासूनच तयारीला लागावे लागेल. क्लासिकल क्रिकेटर राहिलेल्या द्रविडकडे प्रशिक्षक म्हणूनही मोठा अनुभव आहे. क्रिकेटमधील नवीन पिढीने प्रामुख्याने द्रविडच्या हाताखाली क्रिकेटचे धडे गिरविले आहेत. या पिढीशी असलेल्या सुसंवादाचाही आगामी काळात संघाला लाभ होऊ शकतो.

Related Stories

मागील दरवाजापाशी इच्छुकांची झुंबड!

Patil_p

गाझापट्टीतील संघर्ष अखेर शस्त्रसंधीने शमला

Patil_p

निश्चयपूर्वक वर्तन एक कौशल्य

Patil_p

हिवाळा अन् सैन्यासमोरील आव्हाने

Patil_p

कृषिउद्योजकता (ऍग्रीप्रेन्युअरशिप)

Patil_p

कलियुगाची आचारसंहिता – श्रीमद् भागवत

Patil_p
error: Content is protected !!