Tarun Bharat

अतिदुर्गम भागातील गरजू विदयार्थ्यांना सायकलचे वाटप…!

क्रिएटिव्ह टिचर्स फोरमचा उपक्रम

उत्रे / प्रतिनिधी

नव्याकोऱ्या गुलाबी रंगाच्या सायकलवरुन शाळेच्या आवारात फेरफटका मारत सायकलची घंटी वाजविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज स्पष्ट दिसून येत होता. खापणेवाडी, कोलीक आणि पडसाळी परिसरातील विद्यार्थी खऱ्या अर्थाने आज आनंदी, उत्साही दिसत होते.

कोल्हापूरपासून 50 किमी अंतरावर पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिदुर्गम डोंगराच्या सानिध्यात असलेल्या विदया मंदिर खापणेवाडी, विदया मंदिर कोलिक या ‍जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विदयार्थी वाड्या वस्त्यावरुन 3 ते 11 किलोमीटर रोजची पायपीट करुन शाळेत येतात. विदयार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सामाजिक भावनेतून कोल्हापूरातील क्रिएटिव्ह टिचर्स फोरमच्या वतीने आयोजित अतिदुर्गम ग्रामीण भागातील गरजू विदयार्थ्यांना सायकलचे वाटप केले. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे आणि शिवाजी विदयापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या हस्ते विदयार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापणेवाडीचे सरपंच फुलाजी पाटील होते.

यावेळी डॉ.हिर्डेकर म्हणाले वाडयावस्तीतून शाळेत आलेल्या विदयार्थींची किमान पदवीधर होईपर्यंत गळती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रात आणून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सायकल हे आरोग्य चांगले ठेवणारे आनंददायी साधन आहे. क्रिएटिव्ह टिचर्स फोरमने सायकल वितरण करून संवेदनशीलता जपली आहे. यामुळे गळती दर नक्कीच कमी होईल आणि या मुलांचे शिक्षण गतीशील होईल. यापूर्वी शिक्षक झाल्यांनतर मी 30 रुपयांची जुनी सायकल विकत घेऊन ती दुरुस्ती करुन वापरली असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

डॉ.लवटे म्हणाले- या विदयार्थ्यांना वाडया वस्त्यावरुन बिकट वाट तुडवत शाळेत यावे लागते. त्यांना सायकल मिळाल्याने त्यांच्या श्रमाची व वेळेची बचत होईल आणि विदयार्थी वाचलेला वेळ अभ्यासाला देतील. क्रिएटिव्ह टीचर्स फोरमने विदयार्थ्यांना सायकल देऊन प्रगतीच्या मार्गावर नेले आहे. मला शालेय जीवनात सायकलीची गरज असताना सायकल मिळाली नाही परंतु शिक्षक झाल्यानंतर कर्ज काढून सायकल विकत घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली.विदयार्थ्यांना सायकल मिळाल्यानंतर कमालीचा आनंद त्यांच्या निरागस चेहऱ्यावर फुलला होता, विदयार्थ्यांचे हसरे चेहरे आम्हाला आनंदी करुन गेल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. यावेळी डॉ.सुनीलकुमार लवटे, डॉ.बी.एम.हिर्डेकर यांनीही शाळेच्या मैदानावर सायकलवरुन फेरफटका मारला.

या उपक्रमासाठी क्रिएटिव्ह टिचर्स फोरमचे दीपक जगदाळे, चंद्रकांत निकाडे, प्रकाश ठाणेकर, विजय एकशिंगे, संजय कळके, संजय पाटील, तुषार चोपडे, राणेश्वर थोरबोले, भिवाजी काटकर, अशोक हुपरे, आर.बी.पाटील, गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, केंद्र प्रमुख तुलशीदास सातपुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बाबुराव माळवी, पोलीस पाटील सौ.उज्ज्वला खापणे, बागोजी ढवण, मंगेश साळुंखे, दत्ता मेटकर, संजय पाटील, राजरत्न खाडे, भाऊसाहेब सोले, गफार बैरागदार इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश ठाणेकर, तर आभार बाबुराव माळवी यांनी मानले.

क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या वतीने दुर्गम भागातील विदयार्थ्यांना 16 नवीन व 8 जुन्या असे एकूण 24 सायकलीचे वाटप केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे, डॉ.बी.एम.हिर्डेकर, सौ.गीता सुतार, शिवाजी सुतार, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस उपाधीक्षक सौ.स्वाती गायकवाड- साळोखे, सुरेश काळे, मुख्याध्यापिका सौ.सुमन पोवार, संजय पाटील (चिंचवाड), सुनील पाटील, सौ.शुभांगी ढवळशंख, सचिन जाधव, शिवाजी कोंडुसकर, सौ.चित्रलेखा कुलकर्णी, सौ.दीपाली शिंगे, राहुल तारळेकर, सौ.पूजा पाटील, अनिल पोवार, बाबुराव काळुगडे, दयानंद जाधव, तुषार चोपडे, के.के.चौगले, सुवर्णा माने, विदया नलवडे, गुलाब आत्तार, संजय पाटील, चंद्रकांत निकाडे, प्रकाश ठाणेकर, संजय कळके, संगीता कनुंजे, विजय घाटगे, लालासाहेब पाटील, मनिषा गुरव यांनी आर्थिक व सायकल देऊन सहकार्य केले.

Related Stories

तीन दानपेट्य़ात 1 कोटी 20 लाख जमा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : बर झालं गव्याचा कळप रात्री आला….

Archana Banage

पर्यटन विकासात औद्योगिक क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावेल – जिल्हाधिकारी

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज येथे बेकायदेशीर किटकनाशकाचा साठा जप्त

Archana Banage

शेतीविषयक सुधारणा विधेयकाची केंद्र सरकारने अंमलबजावणी करु नये : शेकाप

Archana Banage

जिल्हा बँक निवडणूक निकाल: निवडून आलेले उमेदवार असे…

Archana Banage