Tarun Bharat

अतिवृष्टी, पूर, कोरोनाचे संकट आणि राजकीय हेवेदावेही

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही भाजपमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. नेतृत्व बदलामुळे भाजप सरकारचे पतन झाले तर निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले आहे.

अतिवृष्टीमुळे उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ात पुराचा सामना करावा लागत आहे. विजापूर, गुलबर्गा, रायचूर, यादगिरी जिह्यात मोठा फटका बसला आहे. भीमेच्या पुराने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तेथील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सुरुवातीला पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. अनेक गावात बोटीतून नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. मदत कार्य सुरू असले तरी ज्या पद्धतीने यंत्रणा राबवायला हवी होती त्या प्रमाणात राबविली जात नाही, अशी ओरड आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ हे गुलबर्ग्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ते पूरग्रस्त भागाला भेट देऊ शकले नाहीत. त्यांच्या कुटुंबातील आठ जण कोरोनाग्रस्त आहेत. मुलगा डॉ. गोपाल कारजोळ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे विशेष विमानाने त्यांना हैद्राबादला हलविण्यात आले आहे. तरीही त्यांच्यावर टीका केली जात आहे.

गोविंद कारजोळ हे एक सज्जन आणि संवेदनशील राजकारणी म्हणून ओळखले जातात. परिस्थितीची जाणीव असतानाही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील आठ जण कोरोनाग्रस्त आहेत. स्वतः त्यांनीही उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते पोटनिवडणुकीच्या प्रचारात दिसले. तुम्हाला पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करता येतो. पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही का अशी त्यांच्यावर टीका केली जात आहे.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वतः गोविंद कारजोळ यांची बाजू उचलून धरली आहे. त्यांचे कुटुंब कोरोनाग्रस्त झाले आहे. म्हणून पूरग्रस्त भागांना त्यांनी भेटी दिल्या नाहीत तरी जिल्हा प्रशासनाशी ते सतत संपर्कात आहेत. मदत कार्यावर त्यांची नजर आहे, असे सांगितले आहे. राजकीय जीवनात एकमेकांवर टीका, हल्ले, प्रतिहल्ले हे होतच असतात. मात्र एखादा नेता संकटात असताना राजकीय उद्देशाने त्याच्यावर तुटून पडणे ही संवेदनाशून्यतेची लक्षणे नव्हेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सतत तीन तास हवाई पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे कर्नाटकात 21,609 कोटीची हानी झाली आहे. केंद्र सरकारकडे तातडीने 10 हजार कोटी मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. कृष्णेपाठोपाठ भीमा काठावरील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना उभारी देण्याची गरज आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मदतीचे हात पुढे करण्याचीही गरज आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचार कार्यात मग्न आहेत. खरेतर हे दोन्ही मतदार संघ भाजपचे नव्हते. आता तेथे कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस, निजदसमोर आपले बाले किल्ले राखून ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे कोरोना महामारी व दुसरीकडे अतिवृष्टी अशा संकटांशी सामना करतानाच या निवडणुका होत आहेत. नोव्हेंबरमध्ये पुढच्या महिन्यात ग्रा.पं. निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. राज्याच्या उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीच्यावेळी आयोगाच्या अधिकाऱयांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या काळात ग्रा.पं. निवडणुका नको, या मतावर सर्वपक्षीय ठाम आहेत. काँग्रेस निजदबरोबरच सत्ताधारी भाजप नेत्यांचेही जवळजवळ असेच मत आहे. आयोग मात्र निवडणुका घेण्यावर ठाम आहे. खबरदारी घेत निवडणुका घ्याव्याच लागणार, अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. नदीकाठावर पूर ओसरत चालला असला तरी रोगराईची भीती कायम आहे. आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडणार अशी शक्मयता हवामान खात्याने वर्तविली आहे. बहुतेक राजकीय पक्ष पोटनिवडणुकीत दंग आहेत. पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, औषधे वेळेत पुरविण्याची गरज आहे.

अतिवृष्टी, पूर, कोरोनाचे संकट सुरू असतानाच राजकीय हेवेदावेही सुरूच आहेत. माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी येडियुराप्पा फार काळ मुख्यमंत्री पदावर असणार नाहीत. लवकरच त्यांना
पायउतार व्हावे लागणार आहे. त्यानंतर उत्तर कर्नाटकातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे, असा बॉम्ब फोडला आहे. या बॉम्बच्या आवाजाने सत्ताधारी भाजपमध्ये हलकल्लोळ माजला आहे. नेतृत्व बदलाची चर्चा काही नवी नाही. अधूनमधून ही चर्चा होत असते. येडियुराप्पा अनेकवेळा या चर्चेला उत्तर देण्याचेही टाळतात. चर्चा मात्र थांबत नाही. आता पुन्हा एकदा नेतृत्व बदलाचा विषय ठळक चर्चेत आला आहे. के. एस. ईश्वराप्पा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व बदलाची शक्मयता फेटाळून लावत बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोटनिवडणूक होत असताना नेतृत्व बदलाच्या पुडय़ा सोडण्याची गरज काय होती, ही तर सरळ सरळ पक्ष विरोधी कारवाई आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. पुढील तीन वर्षे येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री असणार आहेत, असे ठणकावून सांगितले आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही भाजपमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. नेतृत्व बदलामुळे भाजप सरकारचे पतन झाले तर निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले आहे. बसनगौडा पाटील यांनी टाकलेला बॉम्ब किती क्षमतेचा आहे, दिवाळीचा फटाका ठरणार की खऱया अर्थाने बॉम्ब ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

रमेश हिरेमठ

Related Stories

गोवा राज्यात अवतरणार शिमगोत्सवी राजवट!

Patil_p

निर्विकल्प समाधी

Patil_p

ऐसें तव गुणकथामृत

Patil_p

नरेंद्र मोदीः विळखा आवळू लागला

Patil_p

मम चित्ता तुमचे पाय

Patil_p

शिवसेनेची गाडी ‘संवादी’ मार्गावर

Patil_p