ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) शिबिरात एका जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकार्याची हत्या करून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने रात्री उशिरा ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.


शिवचंद्र राम असे आत्महत्या केलेल्या बीएसएफ हवालदाराचे नाव आहे. तर हत्या झालेल्या अधिकाऱ्याचे नाव अद्याप समजू शकले नाही.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेणुका सीमा चौकीवर बीएसएफच्या 125 व्या बटालियनचे एक युनिट तैनात आहे. तिथे त्यांचे शिबीर चालू होते. अधिकार्याने राम यांना सकाळी लवकर प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले होते. मात्र, हवालदार शिवचंद्र राम रविवारी सकाळी कामावर उशिरा आले. फाटक उघडायला उशीर झाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला.
अधिकारी आणि हवालदार यांच्यातील वाद टोकाला गेल्याने हवालदार शिवचंद्र राम यांनी वरिष्ठ अधिकार्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.