Tarun Bharat

अधिवेशनात महापालिका निवडणुकांचे पडसाद

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशनाला 3 मार्चपासून सुरूवात होत असून गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता हे अधिवेशन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळी ठरणार यात शंका नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांची आयकर विभागाने केलेली मॅरेथॉन तपासणीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘बदल अटळ आणूया कमळ’ या नावाने जोरदार पॅम्पेन सुरू केले असून दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीला डॅमेज करण्यासही सुरूवात केली आहे. त्यामुळे तब्बल 17 दिवस चालणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडसाद उमटणार हे नक्की

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन अर्थसंकल्पीय अधिवेशन झाली. मात्र कोरोनाचा संसर्ग असल्याने दोन्ही अधिवेशने ही आठवडय़ाभरात गुंडाळ्ण्यात आली. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 3 ते 25 मार्च या कालावधीत मुंबईत होणार आहे. मुंबई, ठाणे,कल्याण -डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई आदी महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका या वर्षी होणार असल्याने या वर्षाच्या पहिल्याच अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्ताधारी शिवसेना विरूध्द भाजप असा सामना रोजच बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून ‘बदल अटळ आणूया कमळ’  या टॅगलाईनखाली जोरदार मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजपच्या गोटातून दुसऱया फळीतील आमदार अमित साटम, मिहीर कोटेचा, प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, मोहीत कंबोज हे रोज शिवसेनेच्या कारभारावर टीका करतात.मुंबई महापालिकेत सत्ता परिवर्तन करण्याचा चंगच जणू भाजपने बांधल्याचे दिसत आहे.

मुंबईत होणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भाजपचे मुंबईतील आमदार आक्रमक होणार यात शंका नाही, त्यात या अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचे  निलंबन मागे घेतल्याने या अधिवेशनात मुंबईतून प्रतिनिधीत्व करणारे आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर आणि पराग अळवणी हे शिवसेनेवर तुटुन पडणार. या आमदारांना मुंबईच्या समस्यांची चांगली जाण आहे. चार पैकी तीन आमदारांनी यापूर्वी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत सत्तेत असताना नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. पालिकेतील शिवसेनेची बलस्थाने आणि शिवसेनेची कार्यपद्धती माहीत असल्याने शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही. मात्र शिवसेनेला पालिकेच्या कारभारावर लक्ष्य करणाऱया भाजपला महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सहकारी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे मुंबईतील एकमेव आमदार असलेले आणि अल्पसंख्याक असलेले मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे मुंबईचा पुढील चेहरा कोण? हा पेच आहे. यापूर्वी मुंबई राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री सचिन अहीर आणि माजी खासदार संजय पाटील तर जिल्हाध्यक्ष राहिलेले प्रकाश सुर्वे हे सध्या शिवसेनेते आहेत.

आमागी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते ज्यांचे मुंबई आणि ठाणे कार्यक्षेत्र आहे आणि ज्यांची आगामी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे नेते भाजपच्या रडारवर  आहेत. त्यात  प्रामुख्याने प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, अनिल परब, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, यशवंत जाधव, नवाब मलिक अशा नेत्यांची लिस्टच किरीट सोमय्या यांनी आपल्या व्ट्टिरवरुन प्रसिध्द करताना थेट या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना आव्हान दिले आहे. ज्या पध्दतीने भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ते बघता आगामी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटणार हे निश्चित. विशेष म्हणजे सोमय्या यांनी ज्या 12 नेत्यांच्या नावाने लिस्ट जाहीर केली त्यात एकाही काँग्रेस नेत्याचे नाव नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढणारी जवळीक लक्षात घेता, भाजपने काँग्रेसबाबत नेहमीच सौम्य भूमिका घेतल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस वेगळी लढल्यानेच भाजपला अधिक फायदा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीला डॅमेज करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्यातच शिवसेनेचे महापालिकेतील प्रमुख नेते असणारे यशवंत जाधव यांची तब्बल 72 तास आयकर विभागाने मॅरेथॉन चौकशी केल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक चेहरा असणारे नवाब मलिक ईडीच्या कोठडीत
आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईत अल्सम शेख, वर्षा गायकवाड हे दोन मंत्री तर अमीन पटेल, झिशान सिद्दीकी असे दोन आमदार त्यात भाई जगताप जे अनेक वर्षे आमदार होते, यांच्यामुळे आगामी काळात मुंबईत काँग्रेसची ताकद वाढणार आहे. या अधिवेशनात विरोधक भाजप सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणणार का? सत्ताधारी पक्ष आक्रमक भाजपचा कसा मुकाबला करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Related Stories

साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा

Patil_p

थेम्सच्या तीरावरून

Patil_p

राज्याभिषेक व्हावा

Patil_p

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (24)

Patil_p

कालिदासाचे मेघदूत….एक खंडकाव्य (25)

Patil_p

घसरणाऱया जिभा

Patil_p