Tarun Bharat

अधिवेशनासाठी हेस्कॉमकडून नागरिक वेठीस

हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती : दररोज वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, पूर्वसूचनेविना वीज गुल

प्रतिनिधी /बेळगाव

हलगा येथील सुवर्णविधानसौध येथे दि. 19 ते 31 डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरणार आहे. अधिवेशन काळात सुरळीत वीजपुरवठा रहावा, यादृष्टीने हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अधिवेशनासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

विधिमंडळ अधिवेशनकाळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शहरातील विद्युत स्टेशनमध्ये दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर हिंडाल्को, उद्यमबाग, नेहरुनगर, रेल्वेस्टेशन येथील विद्युत उपकेंद्रांमध्ये देखरेख केली जात आहे. शहरापासून सुवर्णविधानसौध परिसरात विद्युतपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्यांची तपासणी केली जात आहे. वर्षातील केवळ दोन आठवड्यांच्या अधिवेशनासाठी स्वतंत्र विद्युतवाहिनीही जोडण्यात आली आहे.

उत्तर कर्नाटकातील विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्यात येते खरे. परंतु केवळ दोन ते तीन तासच बेळगावच्या प्रश्नांवर चर्चा होते. त्यामुळे दोन आठवड्यांच्या अधिवेशनासाठी नागरिकांना मात्र वेठीस धरले जाते. नोव्हेंबरच्या अखेरीपासून हेस्कॉमकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वीज नसते. यामुळे व्यवसाय-उद्योगांना फटका बसत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

पूर्वसूचना नसताना वीज गायब

रविवारी विकेंड असल्यामुळे नोकरदार आपल्या कुटुंबासमवेत घरी असतात. परंतु हेस्कॉमकडून प्रत्येक रविवारी विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. मागील रविवारी अनेक ठिकाणी लग्न कार्ये होती. परंतु वीज नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. लग्नाची धांदल सोडून जनरेटर कोठे मिळतो का? हे पाहण्याची वेळ आली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी किमान पूर्वसूचना तरी द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

नाशिक-बेळगाव विमानसेवा आजपासून

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्दमध्ये समितीचा बालेकिल्ला अभेद्य

Patil_p

मुचंडी, अगसगा येथे वीज कोसळून गवतगंजींना आग

Amit Kulkarni

मच्छे ब्रम्हलिंग मंदिरातील महाप्रसाद रद्द

Patil_p

गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा…!

Amit Kulkarni

चोरी प्रकरणी तारिहाळ येथील चौकडीला अटक

Tousif Mujawar