Tarun Bharat

अनधिकृत वसाहती अधिकृत करा

निपाणी पालिका बैठकीत मागणी : बजेटपूर्व बैठकीत विविध विषयांवर चर्चा, आजी-माजी नगरसेवकांनी मांडल्या समस्या

प्रतिनिधी / निपाणी

निपाणी शहर व उपनगरात अनेक वसाहती अनधिकृत आहेत. या वसाहतींना नगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र यातून कोणतेही उत्पन्न पालिकेला मिळत नाही. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी सदर अनधिकृत वसाहती अधिकृत कराव्यात, अशी मागणी नगरपालिका बैठकीत करण्यात आली.

निपाणी पालिकेत गुरुवारी दुसरी बजेटपूर्व बैठक पार पडली. यावेळी आजी-माजी नगरसेवक व नागरिकांनी विविध सूचना व समस्या मांडल्या. प्रारंभी पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी स्वागत केले. माजी सभापती दीपक माने यांनी अनधिकृत वसाहतींचा मुद्दा मांडला. नगरसेवक राजू गुंदेशा यांनी, अशोकनगर व बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना केली. नगरसेविका सोनल कोठडिया यांनी, जुना मोटरस्टँडमधील गाळय़ांचे नूतनीकरण करावे तसेच भाजी मार्केटचा विस्तार करून उत्पन्न वाढविण्याची सूचना केली. नगरसेविका आशा टवळे यांनी शहर व उपनगरातील चौकांचे सुशोभीकरण तसेच नगरसेविका दीपाली गिरी यांनी महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.

नगरसेवक संतोष सांगावकर यांनी, शहरातील नगरपालिकेच्या मालकीची समुदाय भवने कमी भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली. माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी, गेल्या तीन वर्षांत निपाणी पालिकेने अंदाजपत्रकात सुमारे 90 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र प्रत्यक्षात यातून झालेली विकासकामे फारशी दिसत नसल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक दत्ता जोत्रे यांनी आजपर्यंत झालेल्या सर्व अंदाजपत्रकांचे मूल्यांकन करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवकांसह विविध नागरिकांनी सूचना मांडल्या.

बैठकीस नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेवक विनायक वडे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. दरम्यान पालिकेत झालेल्या दोन्ही बजेटपूर्व बैठकांना विरोधी नगरसेवकांनी दांडी मारल्याचे दिसून आले.

Related Stories

सेंट झेवियर्स अंतिम फेरीत

Amit Kulkarni

‘त्या’ तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Amit Kulkarni

आता केबीसी लॉटरीच्या नावाने फसवणुकीचा फंडा

Patil_p

हिंडलगा लक्ष्मीनगर येथे अतिक्रमण करून खोदली कूपनलिका

Amit Kulkarni

हुबळी-अंकोला रस्त्यावर टँकर उलटून चालक जखमी

Amit Kulkarni

रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकरांचे शिल्प उभारणार

Amit Kulkarni