Tarun Bharat

अनाथ आश्रमात वाढदिवस करण्यावर निर्बंध

राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी /बेळगाव

कोणतेही दान करणारी व्यक्ती ही मोठीच असते. परंतु दान देणाऱयांकडून दान घेताना घेणाऱयाच्या भावनेचा संकोच होतो. अलिकडे अनेक अनाथ आश्रमांमधील मुलांना पुढे करून विविध देणग्या मिळविण्याचे प्रकार वाढत आहेत. शिवाय या देणग्यांचा विनीयोग मुलांसाठीच होतो याचीही खात्री राहिली नाही. मुलांना दान देणारी अनेक मंडळी आहेत. परंतु आपले कोणी नाही, आपण अनाथ आहोत म्हणून हे दान देण्यात येत आहे, ही भावना अनाथ मुलांमध्ये फार लहानपणापासूनच घर करते.

याचा विचार उशिरा का होईना बाल रक्षण संचालनालयाने केला आहे. त्यामुळे यापुढील काळात बाहेरच्या मंडळींचे वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बऱयाचवेळी राजकारणी, उद्योजक, समाजसेवक, अधिकारी, विविध संघ-संस्था आपले वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कधीकधी दिवसकार्य यानिमित्ताने अनाथ आश्रमाला जेवण देतात. आपल्या मुलांचा व आपला वाढदिवसही तेथे साजरा करतात. वाढदिवस असणाऱया व्यक्ती उत्सवमूर्ती असतात. परंतु तेथे आधीच दीनवाण्या मनःस्थितीत असणाऱया मुलांच्या मनावर याचा परिणाम होतो. आपल्यासाठी कोणी असे करणार नाही, अशी एक नकारात्मक भावनाही त्यांच्या मनात रुजू लागते. याचा विचार आता केला गेला आहे. म्हणूनच आता अनाथ आश्रमात वाढदिवस करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अनाथ आश्रमांमध्ये बालकामगार, बालविवाहाला बळी पडलेली, अत्याचाराला बळी पडलेली मुले, भीक मागणारी मुले, कुमारीमातांनी सोडलेली मुले, यांना बाल कल्याण समिती व बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार बाल संरक्षण केंद्रात किंवा अनाथ आश्रमात दाखल केले जाते. त्यांच्यासाठी अनेक मंडळी देणग्यांची विचारणाही करत असतात. खासगी स्वरुपात चालविणाऱया अनाथ आश्रमांमध्ये विविध व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवस आधीच शुभेच्छा देऊन वाढदिवसादिवशी देणगी द्या, भोजनाची व्यवस्था करा किंवा नाष्टा द्या, असे आवाहन केले जाते.

या स्वरुपाचे संदेश समाज माध्यमावरही फिरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला इच्छा नसली तरी नकार देणे कठीण जाते. अशा मंडळींची गैरसोय सुद्धा लक्षात घेतली गेली आहे. त्यामुळे यापुढे बाहेरच्या व्यक्तींचे अनाथ आश्रमात होणारे वाढदिवस करण्यावर सरकारने निर्बंध आणले आहेत.

सरकारचा निर्णय योग्य…

कोणत्याही व्यक्तीला कोणाकडून मदत घेताना संकोचच होतो. बाहेरील कोणी तरी येवून आपल्याला मदत करते आणि आपले पालक मात्र येत नाहीत याची एक तीव्र वेदना मुलांमध्ये आसपासचे वातावरण पाहून वाढीला लागते. त्यामुळे सरकारचा हा निर्णय अतिशय योग्य आहे.

– जे. टी. लोकेश जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

Related Stories

रामतीर्थनगर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

Amit Kulkarni

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni

रामघाट रोडवरील गळतीनिवारणाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

प्रांताधिकाऱ्यांनी पुन्हा घेतला काढता पाय

Amit Kulkarni

अनगोळ नाका गाळे दुसऱयांदाही बोलीविना

Omkar B

कोविड लसचा दुसरा डोस देण्यास टाळाटाळ

Omkar B