ऑनलाईन टीम / मुंबई :
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना (पीए) शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. आज सकाळी 11 वाजता दोघांनाही पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे.
शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरच्या घरी धाड टाकल्यानंतर देशमुखांची दुपारी कसून चौकशी करण्यात आली होती. तर संध्याकाळी ईडीच्या कार्यालयात त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री 11 नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.


अनिल देशमुखांच्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिन संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. पुढील काही दिवसांत अनिल देशमुखांनाही अटक होईल, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.