ऑनलाईन टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथकं नागपूरमधली नसून बाहेरून आल्याची माहिती आहे.
देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयकरच्या पथकानं छापेमारी केली. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
याआधी अनिल देशमुख यांना ईडीकडून चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावण्यात आलेले आहेत. मात्र, अजून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे ईडीनं त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस देखील काढली. त्यातच आता आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमुळे देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


previous post