ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा अपेक्षित होताच, मात्र हा राजीनामा देण्यास उशीर झाला आहे.


आमची अपेक्षा अशी होती, की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार यांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली.
- मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे
पुढे ते म्हणाले, देशमुखांचा राजीनामा या आधीच घ्यायला पाहिजे होता. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकही शब्द का बोलत नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे.
अनिल देशमुख यांना नैतिकता पहिल्याच दिवशी आठवायला पाहिजे होती. राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता असा टोमणा मारत या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटले आहे.
- …. यामध्ये जनता मात्र, भरडली जाते आहे
हे तीन चाकी सरकार असून तीन दिशांना पळत आहे. तसेच जनतेला धोका देऊन सत्तेवर आलेले सरकार आहे. यामध्ये जनता मात्र, भरडली जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री स्वतः ला मुख्यमंत्री समजत आहे. या प्रकरणातील काही हस्तक अजूनही समोर आलेली नाहीत. तसेच या प्रकारात मुंबई पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.