Tarun Bharat

अनुदानित शाळांमध्ये 11 हजार शिक्षकपदे रिक्त

प्राथमिक अनुदानित शाळांमध्ये अनेक वर्षांपासून नेमणुकाच नाहीत

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये मागील अनेक वर्षांपासून नेमणुकीच्या प्रक्रियेला मंजुरी न दिल्यामुळे सुमारे 11 हजार पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

राज्यात 2,326 अनुदानित प्राथमिक शाळा आणि 2819 माध्यमिक अनुदानित शाळा आहेत. यापैकी मोजक्याच शाळांना काही वर्षापूर्वी अनुदान मिळाले आहे. अनेक शाळांना आधीपासून अनुदानप्राप्त आहेत. मात्र, या शाळांमध्ये नेमणुकीसाठी आदेश न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. दरवर्षी अनुदानित शाळांमधून सेवानिवृत्त होणाऱया शिक्षकांची भर पडत असल्यामुळे रिक्त जागांमध्येही वाढ होत आहे.

राज्यात अनुदानित शाळांमध्ये एकूण 36 हजार शिक्षकपदे आहेत. त्यापैकी 25 हजार जागांवर शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत. या जागांवर काही शाळांनी खासगी तत्वावर तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. 1 जून 1999 नंतर अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये रिक्त जागांवर शिक्षक नेमणुकीसाठी सरकारने आदेशच जारी केलेला नाही. त्यामुळे अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेने राज्य सरकारकडे अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा दखल घेण्यात आलेली नाही.

2019 मध्ये अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असणाऱया 3,633 जागांवर नेमणुकीला सरकारने संमती दिली तरी अनेक शाळांमध्ये नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान सरकारने अनुदानित प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांबाबत कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे नेमणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्यांमध्ये निराशा आहे.

सरकारकडून नेमणुकीला विलंब होत असल्याने अनुदानित शाळांनी अतिथी शिक्षकांप्रमाणे तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षक पदवीधरांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पण, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित कामे करण्याचा अनुभव आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शाळेच्या एकूण कामकाजावर होत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 22,150 शिक्षकपदे रिक्त आहेत. तर 3,453 माध्यमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अलिकडेच 10,565 जागांच्या भरतीसाठी कार्यवाही करण्यात आली होती. सुमारे 65 हजार उमेदवारांनी स्पर्धात्मक परीक्षा दिली. पण त्यापैकी केवळ 14 हजार उमेदवार पात्र ठरले. त्यामुळे शिक्षण खात्याला मुलाखतीसाठी बोलावण्यासाठी 1:2 प्रमाणातही उमेदवार उपलब्ध झाले नाहीत.

Related Stories

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम

Archana Banage

‘जंतर-मंतर’वर भरली किसान संसद

Amit Kulkarni

सीमेक्षेत्रात मार्गबांधणी करणारच

Patil_p

परिस्थितीप्रमाणे धोरण बदलणे आवश्यक

Amit Kulkarni

बिहारमध्ये सापडले सर्वात मोठे सुवर्णभांडार

Patil_p

बिहारमध्ये 264 कोटींचा सेतू 29 दिवसांतच गेला वाहून

Patil_p