ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने लोकसभेत परित केलेल्या शेती विषयक तीन विधेयकामुळे वातावरण तापले असून या विधेयकांना तीव्र विरोध होत आहे. त्यातच अकाली दलाने देखील विधेयकावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आज बिहारमध्ये रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. काही लोकं शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पण या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे.
आज बिहारमध्ये एका पुलासह 12 रेल्वे योजनांचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वतः चे पीक स्वतः विकून कमाई वाढवू शकणार आहे. या विधेयकांबद्दल मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. ही विधेयक शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दलालांपासून वाचवण्यासाठी आणली आहेत, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


देशातील काही लोक जे अनेक दशकं सत्तेत होते, देशावर ज्यांनी राज्य केले ते लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांशी खोटं बोलत आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते. आपल्या जाहीरनाम्यातही सांगत होते. पण निवडणुकीनंतर सगळे विसरुन जात होते, अशी अप्रत्यक्ष टीकाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर केली.
मात्र, आता त्याच गोष्टींची पूर्तता एनडीए करत आहे तेव्हा खोटी माहिती पसरवली जात आहे. पण देशातील शेतकरी किती जागरूक आहे ते हे लोक विसरत आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या माध्यमातून योग्य मूल्य देण्यास कटिबध्द आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.