Tarun Bharat

अन्योक्ति…(सुवचने)

मराठीमध्ये ‘लेकी बोले सुने लागे’ अशी एक म्हण आहे. म्हणजे प्रत्यक्षात बोलायचे लेकीशी पण ते सुनेने ऐकावे अशी इच्छा. म्हणून जरा मोठय़ानेच सासू बोलते. त्यातून जो काही बोध घ्यायचा तो सुनेने घ्यावा ही अपेक्षा. म्हणजे थोडक्मयात ‘टोमणे मारणे’ असेही आपण म्हणू शकतो. उदा. एखादी व्यक्ती आपण किती कर्तृत्ववान, श्रीमंत, हुशार वगैरेपैकी आहोत, असे स्वतःहूनच मोठेपणा सांगत असेल, प्रत्यक्षात तिची तेवढी पात्रता नसेल तर टोमणा मारला जातो, ‘बेडकी कितीही फुगली तरी तिचा हत्ती होणार नाही!’ आले ना लक्षात? तर असाच एक प्रकार म्हणजे ‘अन्योक्ति’.

काकस्य गात्रं यदि काञ्चनस्य, माणिक्मयरत्नं यदि चञ्चूदेशे। एकैकपक्षे ग्रथितं मणिनां, तथापि काको न तु राजहंसः।।

अर्थ-कावळय़ाचे अवयव जरी सोन्याचे असले, चोचीच्या ठिकाणी माणिक नावाचे रत्न असले, एकेका पंखात जरी मणी गुंफले, तरी कावळा कधी राजहंस होणार नाही!

थोडक्मयात कावळय़ाने कितीही हिरेमाणके घालून नटण्याचा प्रयत्न केला, तरी तो सुंदर दिसणार नाही. कारण सौंदर्य हे नैसर्गिक असते. हंसाला वेगळे काही घालून नटण्याची गरजच नसते. तो जन्मतःच सुंदर असतो, शुभ्र पांढरा रंग, डौलदार मान, चोच आणि त्याचे पाण्यात विहरणे हे सारेच सुंदर असते. त्यासाठी त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. अभिजात सौंदर्य त्याला लाभलेले असते. त्यामुळे लोकांचे लक्ष त्याच्याकडे आपोआप वेधले जाते. तद्वतच सुंदर व्यक्तीकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. ‘जातीच्या सुंदराला काहीही शोभून दिसते’ असाही एक वाक्प्रचार आहे. साधेपणातही सौंदर्य उठून दिसते.

समाजात आपण आजूबाजूला पाहतो की, कृत्रिम सौंदर्यसाधने वापरून, चित्रविचित्र कपडे घालून कित्येक व्यक्ती आपण सुंदर दिसण्याचा अट्टहास करत असतात. पण खरे सौंदर्य हे अंतरंगाचे असते. तुमचे मन जितके सुंदर असेल, तो भाव जर तुमच्या चेहऱयावर, वागण्या बोलण्यात असेल, तर वरवरच्या सौंदर्याला कुणीही भुलणार नाही. रंग, चेहरा ही सौंदर्याची बाह्यलक्षणे आहेत. ती कायम टिकत नाहीत. वयोमानानुसार त्याची झळाळी निघून जाते. पण तुमच्या गुणांचे सौंदर्य, आंतरिक सौंदर्य हे कायम टिकणारे असते. ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा?’ ऊस कितीही वाकडा असला तरी आतला गोड रस वाकडा नसतो. त्यामुळे ‘वरलिया रंगा’ कधी भुलू नये असेच चोखोबांनीही सांगितले आहे. आणखी एक अन्योक्ती एक वेगळाच विचार सांगणारी आहे. ‘मौनं सर्वार्थसाधनम्।’ काही वेळा मौन पाळणे हे श्रेयस्कर ठरते. जिथे आपला एखादा चांगला विचार ऐकण्याच्या मनःस्थितीत कुणी नसते, तेव्हा समोर चाललेला गोंगाट, गलबलाच बरा आहे, असे समजून सुज्ञ माणूस गप्प राहतो. कारण तो बोलला तरी त्याचा कोणावर इष्ट परिणाम होणारा नसतो. हे त्या माणसाला कळते. वसंत ऋतूत ‘कुहूकुहू’ अशा गोड आवाजाने साऱयांचे लक्ष वेधून घेणारा कोकीळ पक्षी पावसाचे आगमन होताच मौनात जातो. हेच सांगणारा हा श्लोक!

भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे।वक्तारौ यत्र दर्दुरास्तत्र मौनं हि शोभते।।

अर्थ – सुंदर गाणारा कोकीळ (पावसाच्या) ढगांचे आगमन होताच मौन धारण करतो. कारण जिथे बेडकांसाखे (डराँव डराँव करणारे) वक्ते आहेत, तिथे मौनच शोभून दिसते. कशी वाटली अन्योक्ति?

आता थोडे संस्कृत शिकूया.

किमर्थम्-कशासाठी, का?

सः किमर्थं विद्यालयं गच्छति? तो कशासाठी शाळेत जातो?

सः पठनार्थं विद्यालयं गच्छति। तो शिकण्यासाठी शाळेत जातो.

सा किमर्थं योगासनं करोति? ती योगासन का करते?

सा आरोग्यार्थं योगासनं करोति। ती आरोग्यासाठी योगासन करते.

सः किमर्थं विदेशं गतवान्? तो विदेशात का गेला होता?

सः प्रवासार्थं विदेशं गतवान्। तो फिरण्यासाठी विदेशात गेला होता.

Related Stories

आषाढीचे आपत्ती व्यवस्थापन!

Patil_p

सद्विद्या किंवा ब्रह्मविद्येची करामत

Patil_p

जिवात्म्याचा खराखरा आप्त, सुहृद व मित्र म्हटला तर तो म्हणजे एक परमात्मा होय

Patil_p

भाजपमध्ये ‘नंबर दोन’ ची लढाई

Patil_p

भाजपमध्ये हायकमांडचे प्रस्थ वाढू लागले

Patil_p

प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट

Patil_p