Tarun Bharat

अपंगत्व दाखल्यांसाठी दिव्यांगांची हेळसांड नको

Advertisements

तपासणी करून तीन महिने उलटत आले, तरी दाखले नाहीत

 225 हून अधिक लाभार्थी दाखल्यांच्या प्रतीक्षेत

प्रतिनिधी / कणकवली:

दिव्यांग, गतिमंद वा अन्य काही कारणास्तव अपंगत्वाचा दाखला आवश्यक असलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाकडून दाखले देण्यात येतात. तसेच 2013 पूर्वीचे ऑफलाईन दिलेले दाखलेही ऑनलाईन करून घ्यावे लागत आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून तपासणी करून दाखल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अशा दिव्यांगांना अद्याप दाखलेच मिळालेले नाहीत. सुमारे 225 हून अधिक दाखले केवळ प्रलंबित असून ते लाभार्थ्यांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हास्तरावर तपासणी करण्यात आलेल्या संबंधित लाभार्थ्यांना अपंगत्वाबाबतचे दाखलेच देण्यात आलेले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सहीने देण्यात येणारे हे दाखले वितरित करण्यात आले नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 2013 ते 2018 या कालावधीत दिव्यांगत्वाबाबत दाखले घेतलेल्या लाभार्थ्यांना दाखले ऑनलाईनच देण्यात आले आहेत. मात्र, त्यांना यूडीआयडी कार्ड मिळण्यासाठी महा ई सेवा केंद्राच्या ठिकाणी जाऊन कार्डसाठी अर्ज करून कार्ड उपलब्ध होते. त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तपासणीसाठी येण्याची गरज नाही.

मात्र, 2013 पूर्वी ज्यांनी दाखले घेतले आहेत, त्यांचे दाखले हे ऑफलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. त्यांना ऑनलाईनने दाखले घेणे आवश्यक आहे.  ज्यांना नव्याने दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनाही हे ऑनलाईनचेच दाखले घ्यावे लागत आहेत. यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात त्या-त्या प्रकारच्या दिव्यंगत्वाबाबत ठरवून देण्यात आलेल्या दिवशी उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी करून हे दाखले देण्याची कार्यवाही केली जाते. येथे संबंधित लाभार्थ्यांना तपासणीसाठी टीमसमोर उपस्थित राहवे लागते. त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून दाखले देण्याची कार्यवाही होते.

अशा पद्धतीने ही कार्यवाही असली, तरीही गेल्या तीन महिन्यांपासून हे दाखलेच वितरित केलेले नाहीत. जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाकडून 225 हून अधिक लाभार्थ्यांचे दाखले प्रलंबित असल्याचे समजते. वास्तविक दिव्यांगाबाबत सहानुभूती दाखवित त्यांना वेळेत दाखले वितरित करण्याची गरज असताना त्याकडे गांभिर्याने का पहिले जात नाही, असा सवाल करण्यात येत आहे.

यात जबाबदार लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱयांनी लक्ष घालून हे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून का थांबविण्यात आली आहे, दिव्यांगांना कितीवेळा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी बोलावून परत पाठविण्यात आले, याबाबतची माहिती घेऊन संबंधितांकडून हे दाखले त्वरित वितरित होण्याच्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

Related Stories

तिलारी भूकंपमापन यंत्र महिनाभरापासून बंद

NIKHIL_N

मनसे बँक अधिकाऱयांना देणार मराठीचे धडे!

NIKHIL_N

दागिने चोरी, तपासात प्रगती नाही

Patil_p

वर्षअखेरीस ‘कशेडी’ अवघ्या दहा मिनिटांत पार !

Patil_p

चालत आलेले दोघे विलगीकरण कक्षात

NIKHIL_N

खेडमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहारातील धान्यात किडे

Patil_p
error: Content is protected !!