Tarun Bharat

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

अजित डोवाल यांची रणनीती- आठ देशांच्या ‘एनएसए’चा बैठकीत सहभाग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत भारतासह 8 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीत अफगाणिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती, विशेषतः आणि त्याचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम यावर चर्चा झाली. सर्व बाजूंनी त्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, दहशतवादामुळे निर्माण होणारे धोके, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, तसेच अफगाण लोकांना मानवतावादी मदतीची गरज यावर भर देण्यात आल्याचे निवेदन बैठकीनंतर जारी करण्यात आले. बैठकीनंतर सर्व ‘एनएसए’नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. अफगाणिस्तानमधील अलीकडच्या घडामोडी केवळ त्या देशातील लोकांसाठीच नाही तर शेजारी आणि प्रदेशासाठीही महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दिल्लीत आठ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे. अफगाणिस्तान कट्टरतावाद, दहशतवादापासून मुक्त राहील आणि कधीही जागतिक दहशतवादाचे स्रोत बनू नये याची खात्री करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. याशिवाय अफगाण समाजातील सर्व घटकांना भेदभावरहित आणि मानवतावादाच्या पातळीवरही मदत मिळवून देण्यावर सहमती झाली. भारताच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पाकिस्तान आणि चीनलाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी त्यात सहभाग घेतला नाही. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत सर्व देशांनी अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आणि तेथून दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवली पाहिजे, असे सांगितले.

अफगाणिस्तान हे जागतिक दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान बनणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सर्वांनी यावेळी सांगितले. बैठकीची सुरुवात करताना अजित डोवाल यांनी मौलिक मार्गदर्शन केले. आम्ही आज अफगाणिस्तानशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटत आहोत. त्या देशातील घडामोडींवर सर्वांचे बारीक लक्ष आहे. याचे केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही तर त्याच्या शेजारी आणि प्रदेशावर देखील महत्त्वपूर्ण परिणाम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर प्रादेशिक देशांमध्ये जवळून सल्लामसलत, अधिक सहकार्य आणि समन्वय साधण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.

पाकिस्तान, चीनची बैठकीला दांडी

‘एनएसए’ पातळीवरील ही बैठक यशस्वीपणे पार पाडण्यात आणि आयोजन करण्यात भारताचे एनएसए अजित डोवाल यांनी मध्यवर्ती भूमिका पार पाडली. भारतासह इराण, रशिया आणि मध्य आशियातील ताजिकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान असे एकंदर आठ देशांचे एनएसए किंवा सुरक्षा परिषदेचे सचिव सहभागी झाले होते. पाकिस्तान आणि चीनलाही या बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. तथापि, या दोन्ही देशांनी आधीच नकार दिला होता. या बैठकीला ‘दिल्ली रिजनल सिक्मयुरिटी डायलॉग ऑन अफगाणिस्तान’ असे नाव देण्यात आले होते.

कोणता देश काय म्हणाला ?

भारत ः प्रादेशिक देशांमधील सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे. या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

रशिया ः अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा बैठकांमुळे अफगाणिस्तानसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल.

इराण ः आपल्यासमोर स्थलांतरितांचे मोठे संकट आहे. अफगाणिस्तानातील सर्व गटांतील लोकांना सरकारमध्ये सामील करूनच हा प्रश्न सुटू शकतो.

किर्गिस्तान ः अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय होत आहेत. अशा स्थितीत आपण अफगाणिस्तानच्या लोकांना मदत केली पाहिजे.

ताजिकिस्तान ः शेजारी देश म्हणून आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करू शकतील अशा सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास तयार आहोत.

तुर्कमेनिस्तान ः या बैठकीद्वारे आम्ही अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढू शकतो आणि या भागात शांतता प्रस्थापित करू शकतो.

कझाकिस्तान ः अफगाणिस्तानातील लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. सध्या देश मानवतावादी संकटाचा सामना करत आहे.

उझबेकिस्तान ः अफगाणिस्तान आणि प्रदेशात संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सामूहिक तोडगा काढला पाहिजे. सर्वांच्या प्रयत्नानेच हे शक्मय आहे.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन

Patil_p

बिपीन रावत सुखरुप असावेत; ‘या’ नेत्यांनी केली प्रार्थना

Abhijeet Khandekar

पंजाबमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 1.88 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

एकपात्री प्रयोगकार अभय देवरे यांचे निधन

Patil_p

शोभा डेव्हलपर्सला 45 कोटीचा नफा

Patil_p

देवभूमीत महा‘आपत्ती’

Patil_p