Tarun Bharat

अफवांचे ‘राजकारण’ वेळीच थांबले पाहिजे!

   पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला इशारा : राजकीय श्रेयवादात जिल्हावासीयांना गोवू नका!

प्रतिनिधी / कुडाळ:

सिंधुदुर्गातील जनता व मुंबई-पुण्यातील सिंधुदुर्गवासीयांनी आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे. त्यांना या जिल्हय़ात आणू नये, असे आपले मत नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. शासनाने जर निर्णय घेतला, तर चाकरमान्यांसह बाहेर अडकलेल्या सिंधुदुर्गवासीयांना येथे आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पुढाकार घेईन, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.

येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगताना सामंत म्हणाले, आपण आय. जी. ना सांगून एक लाख पास दिले, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. आपण एवढा मोठा नाही. काल जी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह सापडली, ते कुटुंब खासदार, पालकमंत्री यांच्या वाहनातून आले, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. हे घाणेरडे राजकारण थांबले पाहिजे. राजकीय श्रेयवादात सिंधुदुर्गवासियांना गोवूया नको, असे ते म्हणाले.

..तर गुन्हे दाखल करायला हवेत!

अफवा कोण पसरवत असेल, तर सोशल मीडियाच्या मुळाशी जाऊन संबंधित पोस्ट कोण तयार करते, याचा शोध घेऊन गुन्हे दाखल करायला हवेत, असे सामंत यांनी सांगून कोरोनाशी लढा देताना राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

परप्रांतीय जर त्यांच्या राज्यात जायला तयार असतील, तर त्यांच्या आरोग्य चाचण्या घेऊन व केंद्र सरकारच्या धोरणाच्या अधीन राहून निर्णय घेतला, तर याबाबतच्या याद्या तयार असणे आवश्यक आहे, असे सामंत यांनी सांगून परप्रांतियांना नेतात व मुंबईकरांना आणत नाहीत, असे राजकारण कोणी करू नका, असे आवाहन केले. जे विद्यार्थी अडकले आहेत, त्यांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, नियम पाळावे लागणारच, असे ते म्हणाले. यापुढे पासधारक जिल्हय़ात कमी कसे येतील हे पाहिले जाईल, असे सांगत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्याचे सांगितले.

जिल्हय़ात विकासकामे सुरू

जिल्हय़ात विकासकामे सुरू झाली असून रस्ते, तलाव, पाणीटंचाईची कामे, हायवे आदी कामे रितसर सुरू करण्यात आली आहेत. मात्र, गेली दोन-तीन वर्षे ठेकेदार कामे करीत नाहीत, यावर जि. प. मधील कामे जास्त आहेत. याबाबत आपण माहिती मागविली असून ज्यांना काम करायचे नाही, त्यांच्याकडून कामे काढून घ्या. ब्लॅकलिस्ट तयार करा, अशा सूचना दिल्याचे सामंत म्हणाले. आठ दिवसांत कामे कशामुळे थांबली, ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

  रेडी शिपमधील कामगारांची तपासणी हवीच

रेडी येथे शिप आल्याने ग्रामस्थ व प्रशासनामध्ये वाद निर्माण झाले आहेत. शिपवर जे लोक आहेत. त्यांची आरोग्य तपासणी व्हावी, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थांची आहे. ती रास्तच आहे, असे सामंत म्हणाले. सर्वसामान्य मुंबई-पुण्यातून आले, तर त्यांना क्वारंटाईन करायचे व शिपवरील कर्मचाऱयांची तपासणी केंद्र सरकार सांगते, म्हणून करायचे नाही, हे योग्य नसल्याचे सामंत यांनी सांगून तपासणीच्या सूचना दिल्या.

तीन तारीखपर्यंत थांबा!

परप्रांतियांबरोबर मुंबईकरांची यादी तयार केली, म्हणजे मोठा गुन्हा केला नाही. मुंबईकरांचीही यादी तयार करायला हवी. ती उपयोगी पडेल, असे सामंत यांनी सांगून यादी केली, म्हणजे चाकरमानी आणले, असे नाही. जास्त रुग्ण मुंबई-पुण्यात सापडतात. लॉकडाऊनचे अद्याप ठरलेले नाही. निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन मेपर्यंत थांबा, असे आवाहन त्यांनी केले. गावकरी व मुंबईकर यांच्यामध्ये संवाद साधावा लागेल, असे स्पष्ट केले.

सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, राजन नाईक, अतुल बंगे, सचिन काळप व अन्य उपस्थित होते.

लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व परीक्षा होतील!

यूजीसीने कॉलेजसह इंजिनिअरिंगच्या परीक्षा घ्याव्यात, असे कळविले असून यूजीसीच्या गाईड लाईन्सचा अभ्यास करून परीक्षा समिती परीक्षांचे वेळापत्रक तयार करेल आणि लॉकडाऊन संपल्यावर परीक्षा होतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. लवकरच याचे वेळापत्रक तयार करण्यात येईल, असे ते म्हणाले. यूजीसीने परिपत्रक काढले असून एफवाय व एसवायच्या परीक्षा 1 ते 15 जुलैपर्यंत संपल्या पाहिजेत व 1 ऑगस्ट रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले पाहिजे, तर बारावीचे निकाल लागून 1 सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले पाहिजे, असे कळविले. यासाठी महाराष्ट्रातील निर्णय घेण्यासाठी कुलगुरुंची समिती स्थापन केली असून सहा लोकांच्या समितीची ऑनलाईन चर्चा होईल व खात्याचा मंत्री म्हणून आपणही या चर्चेत सहभागी असेन, असे सामंत यांनी सांगून त्यानंतर याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविला जाईल व नंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षा होतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

घरातील 27 हजाराचे दागिने लंपास

Patil_p

भरधाव ट्रकची इर्टीगा कारला धडक

Patil_p

इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात उदासीनता

Patil_p

‘शाळा तिथे मुख्याध्यापकपद’

NIKHIL_N

इंधन दरवाढ, शेतकरी कायद्याविरोधात जिह्यात शिवसेनेची निदर्शने

Patil_p

लोटेत रासायनिक कंपनीचे सांडपाणी ओढय़ात

Patil_p