Tarun Bharat

अबिद अली अर्धशतकासमीप

वृत्तसंस्था / साऊदम्प्टन :

गुरुवारपासून सुरू झालेल्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकने शेवटची बातमी हाती आली तेव्हा 33.5 षटकांत 2 बाद 85 धावा जमविल्या होत्या. पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबविण्यात आला होता, त्यावेळी अबिद अली 49 व बाबर आझम 7 धावांवर खेळत होते. सकाळच्या सत्रातही पावसाचा अडथळा आल्याने उपाहाराचा बेक लवकर घेण्यात आला होता.

मँचेस्टरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवित यजमान इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सामन्यात पाकचा कर्णधार अझहर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांची अपेक्षित सुरुवात झाली नाही. तिसऱयाच षटकात पहिल्या कसोटीतील शतकवीर शान मसूदला जेम्स अँडरसनने पायचीत करून पाकला पहिला धक्का दिला. यावेळी पाकच्या 6 धावा झाल्या होत्या. मसूदला केवळ एक धाव जमविता आली. अबिद अली व कर्णधार अझहर अली यांनी डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी संघाचे अर्धशतक 21 व्या षटकात फलकावर लावले. पण 24 व्या षटकावेळी पावसास सुरुवात झाल्यानंतर पंचांनी उपाहार घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकने 23.4 षटकांत 1 बाद 62 धावा जमविल्या होत्या तर अबिद 33 व अझहर 20 धावांवर खेळत होते.

अझहर पुन्हा अपयशी

उपाहारानंतरच्या सत्रात अझहर लवकर बाद झाला. उपाहाराआधीच्या धावसंख्येत त्याला एकाही धावेची भर घालता आली नाही. त्याला अँडरसननेच बर्न्सकरवी झेलबाद केले. त्याने 85 चेंडूंत 20 धावा जमविताना केवळ एक चौकार मारला आणि अबिदसमवेत दुसऱया गडय़ासाठी 72 धावांची भर घातली. पहिल्या कसोटीतही अझहर फलंदाजीत अपयशी ठरला होता. अँडरसन व ब्रॉड भेदक मारा करीत होते. पण सॅम करन प्रभावी वाटत नसला तरी पाकचे फलंदाज फार सावध खेळत होते. बाबर व अबिद यांनी डाव पुढे सुरू ठेवला होता. पण 34 व्या षटकावेळी पुन्हा मुसळधार पावसास सुरुवात झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला. यावेळी पाकच्या 33.5 षटकांत 2 बाद 85 धावा झाल्या होत्या आणि अबिद 49 व बाबर 7 धावांवर खेळत होते.

अँडरसनने 12 षटकांत 24 धावा देत 2 बळी मिळविले होते तर ब्रॉडने 10 षटकांत 21, वोक्सने 6 षटकांत 21 व करनने 5.5 षटकांत 11 धावा दिल्या होत्या.

पाकने या सामन्यात शादाब खानला वगळून फवाद आलमला स्थान दिले आहे तर इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी झॅक क्रॉलीला आणि जोफ्रा आर्चरच्या जागी सॅम करनला संघात स्थान दिले आहे.

Related Stories

भारत यू-17 फुटबॉल संघाचा ओमानवर विजय

Patil_p

अफगाणची टी-20 मालिकेत विजयी सलामी

Patil_p

विद्याराणी देवीला रौप्य

Patil_p

अरेबियन टेनिसपटू जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह; 3 सदस्य आयसोलेट

datta jadhav

एटीपी मानांकनात मेदव्हेदेव दुसऱया स्थानी

Patil_p