Tarun Bharat

अभूतपूर्व वीज संकटाची चाहूल

दिल्ली, उत्तर प्रदेश समवेत अनेक राज्यांमध्ये दाटू शकतो ‘काळोख’- कोळशाचा पुरेसा साठा नसल्याने उद्भवणार स्थिती

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चीन, लेबनॉननंतर आता भारत सद्यकाळात अभूतपूर्व वीज संकटाच्या उंबरठय़ावर आहे. कोळशाची कमतरता हे याचे कारण आहे. देशातील एकूण 135 औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक प्रकल्पांकडे केवळ 2-4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा राहिल्याचे वृत्त आहे. भारतात एकूण वीजनिर्मितीपैकी 70 टक्के विजेचे उत्पादन कोळशाद्वारे होते. सणासुदीच्या काळात विजेची मागणी प्रचंड वाढते. औद्योगिक आणि घरगुती विजेचा वापर वाढलेला असतो अशा स्थितीत हे संकट उद्भवल्यास मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. सणासुदीच्या काळानंतर वीजपुरवठय़ात स्थिरता येईल, असे तज्ञांचे मत आहे. तर मार्चपर्यंत प्रकल्पांकडे पुरेसा कोळसा साठा निर्माण होऊ शकतो.

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागताच भारतात विजेची मागणी वेगाने वाढली आहे. मागील दोन महिन्यांमध्येच विजेचा वापर 2019 च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढला आहे. याच काळात जागतिक स्तरावर कोळशाचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे वीजनिर्मितीचा खर्च वाढल्याने संबंधित कंपन्या घायकुतीस आल्या आहेत. यातून भारताची कोळसा आयात कमी होत 2 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचली आहे. जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार आणि चौथ्या क्रमांकाचा साठा असणाऱया भारताकडे आता पुरेसा साठाच नसल्याचे समजते.

कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे काम बंद पडले आहे. याचा परिणाम काही राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ग्राहकांना वीजकपातीस तयार राहण्याचे संदेश संबंधित वीज कंपन्यांकडून मिळू लागले आहेत. काही राज्यांमध्ये अघोषित वीज भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. हे संकट लवकर दूर न झाल्यास उर्वरित राज्यांमध्येही लवकरच हीच वेळ येण्याची भीती आहे.

राज्यांमध्ये संकट तीव्र

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी कोळसा संकटाचे गांभीर्य पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. पंजाबच्या शहरांमध्ये 4 तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. उत्तरप्रदेशात ग्रामीण भागांमध्ये घोषित स्वरुपात 4-5 तासांचे वीज भारनियमन सुरू झाले आहे. शहरी ग्राहकांना अघोषित स्वरुपात कित्येक तास वीजसंकटाला तोंड द्यावे लागत आहे.

राजस्थान बेहाल

राजस्थान मागील तीन महिन्यांपासून या संकटाला तोंड देतोय. राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये 7-8 तास वीजच नसते. राजधानी जयपूर समवेत अनेक जिल्हय़ांमध्ये 4 तासांपर्यंत वीजकपातीचे आदेश देण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातही कोळशाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठय़ावर प्रभाव पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक प्रकल्पांमधील वीजनिर्मिती रोखण्यात आली आहे किंवा पूर्णक्षमतेने वीजनिर्मिती होत नसल्याचे चित्र आहे.

…तर दिल्लीत ब्लॅकआउट

कोळशाचा पुरवठा न झाल्यास दोन दिवसांनी पूर्ण दिल्लीत ब्लॅकआऊट होऊ शकतो अशी भीती व्यक्त होतेय. टाटा पॉवर या कंपनीने ग्राहकांना संदेश पाठवून दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठय़ात अडचणी येऊ शकतात, असे कळवून सतर्क केले आहे. ही कंपनी उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिल्लीत वीजपुरवठा करते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

लेबनॉनमध्ये तीव्र संकट

चीन आणि भारतानंतर पश्चिम आशियाई देश लेबनॉनमध्ये विजेचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. लेबनॉनमध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे अनेक दिवसांसाठी वीजकपातीची घोषणा करण्यात आली आहे. दोन वीजस्थानकांनी काम थांबल्याने पूर्ण देश काळोखात बुडाला आहे.

चीन हवालदिल

चीनच्या ईशान्य भागांमध्ये सुरू झालेले विजेचे संकट आता वाढतच चालले आहे. अनेक कारखाने, मॉल, दुकाने बंद करावी लागली आहेत. उत्पादन ठप्प झाल्याने आवश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. विजेच्या अभावी ऍपल, टेस्ला यासारख्या दिग्गज कंपन्यांनाही स्वतःच्या उत्पादनात मोठी कपात करावी लागली आहे. कोळशाची कमतरता दूर करण्यासाठी चीन आता विदेशातून वेगाने आयात करण्यावर भर देत आहे.

Related Stories

मराठा आरक्षण सुनावणी महत्वाच्या टप्प्यावर

Archana Banage

‘आप’चा अमृतसरमध्ये विजयोत्सव

Patil_p

रायपूर महापौरांच्या घरावर ईडीचा छापा

Patil_p

सरकारी शाळेतील मुले कोडिंगमध्ये तरबेज

Patil_p

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार

Patil_p

सिलिंडर स्फोटाने राजस्थान हादरले

Patil_p
error: Content is protected !!