Tarun Bharat

अमरचे खुनी बारा तासांत गजाआड

पोलिसांची कारवाई यशस्वी : खुनी मुंबईतील गुन्हेगार : प्रकरण सुपारीचेच असण्याची शक्यता

प्रतिनिधी /वास्को

बोगमाळोतील रंघवी इस्टेट जवळ नवेवाडे वास्कोतील अमर नाईक या युवकावर गोळय़ा झाडून त्याचा खून करून घटनास्थळावरून पसार झालेल्या त्या संशयित खून्यांना बारा तासांच्या आत गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी पहाटे कासावलीतील रेल मार्गानजीक त्यांना ताब्यात घेण्यात आले. शुभम सिंग (22) व शैलेश गुप्ता (29) अशी या संशयित खुन्यांची नावे असून ते दोघेही मुळचे उत्तर प्रदेशातले व मुंबईत स्थायिक झालेले आहेत.

 अमर नाईक याचा खून सुपारी देऊनच घडवून आणल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले असून या प्रकरणात अन्य काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासात सर्व गोष्टी उघड होतील, असे दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी म्हटले आहे.

अमर नाईक या युवकाचा दिवसाढवळय़ा डोक्यावर गोळय़ा झाडून खून करण्यात आल्याची वार्ता गुरूवारी वास्कोत पसरताच एकच खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेमुळे पोलीस यंत्रणाही जेरीस आली होती. अमर नाईक याचा खून करणारे सराईत गुन्हेगार आणि शूटर असल्याचे दिसून आले होते. ते राज्याबाहेरील व बहुतेक मुंबईतले असावेत याच्यावरही शिक्कामोर्तब झाले होते. परंतु ते पसार झाल्याने राज्याबाहेर निसटण्याच्या शक्यतेने जनमानसात चिंता निर्माण झाली होती. परंतु घटनास्थळावरून निसटण्याच्या प्रयत्नात त्यांची स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजुच्या अडगळीत अडकून पडल्याने पोलिसांना महत्वाचा दुवा सापडला होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी राज्याच्या सीमा आणि मोक्याच्या ठिकाणी गस्त ठेवून पूर्ण खबरदारी घेतली होती. तरीही पोलीस यंत्रणेचे सारे लक्ष दाबोळी बोगमाळो कासावली या परिसरावर केंद्रीत होते. त्यामुळेच त्या दोघाही संशयित खुन्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना बारा तासांच्या आत यश आले.

कासावलीतील रेलमार्गाजवळ दोघानांही केले जेरबंद

ज्या ठिकाणी संशयितांची कार अडकली ते ठिकाण जास्त लोकवस्तीचे नसल्याने कारमधून बाहेर पडून ते लगेच कार सोडून तेथील झाडीत घुसले व वाट काढीत राहिले. याच शक्यतेने पोलिसांनीही जाळे लावले होते. या जाळय़ात ते पहाटेच्यावेळी अडकले. संशयित खूनी बोगमाळोतील त्या घटनास्थळापासून बऱयाच अंतरावर असलेल्या रेलमार्गापर्यंत पहोचले होते. त्यानंतर त्यांनी रेलमार्गाच्या बाजुच्या झाडीतून लपत छपतच वेलसाव व पुढे कासावली गाठली. रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेनेच पसार होण्याचे त्यांचे नियोजन असावे. मात्र, पोलिसांच्या नियोजनबध्द सापळय़ामुळे कासावलीतील रेलमार्गाजवळच ते हाती लागले.

पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघाही संशयित खुन्यांना पहाटेच्या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना खुनाच्या गुन्हय़ाखाली अटक करण्यात आली. संशयित खुन्यांना जेरबंद करण्यासाठी वास्को, मुरगाव, दाबोळी व वेर्णातील पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. ही कामगीरी यशस्वी करण्यासाठी कॉबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. शेवटी ही कारवाई यशस्वी ठरली.

सुपारी देऊनच खून करण्यात आल्याची शक्यता

पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी या खून प्रकरणासंबंधी अधिक माहिती आताच देणे शक्य नसल्याचे सांगून अधिक चौकशीनंतरच अमर नाईक याचा खून करण्याचा उद्देश काय व या प्रकरणामागे अन्य कोण आहेत, त्यांनी कसे नियोजन केले होते याचा उलगडा होईल असे स्पष्ट केले. मात्र, अटक करण्यात आलेले संशयित खुनी हे गुन्हेगार असल्याचे दिसून आल्याने हे खून प्रकरण सुपारी देऊनच कुणी तरी घडवून आणलेले आहे हे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.

अद्याप पिस्तुल सापडले नाही

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार गजाआड करण्यात आलेल्या संशयित खुन्यांची नावे शुभम सिंग व शैलेश गुप्ता अशी आहेत. ते मुळ उत्तर प्रदेश राज्यातील असले तरी त्यांचे वास्तव्य मुंबईत असते. शुभम हा क्रेन ऑपरेटर म्हणून तर शैलेश हा वाहनचालक म्हणून काम करीत होते असेही उघडकीस आले आहे. या संशयित खुन्यांनी अमर नाईक याचा खून करण्यासाठी वापरलेले पिस्तुल अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. मात्र, स्विफ्ट कारसह या कारमध्ये काही काडतुसे व तिथे सापडलेल्या खूनाशीसंबंधीत अन्य काही वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

तिसऱया भेटीत अमर नाईक याचा खून

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी यापूर्वी 7 व 8 जुलैला घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली हेती. मुंबईत राहणाऱया या संशयितांना त्यांच्याच एका मित्राने गोव्यात बोलावले होते. ती व्यक्ती कोण हे सांगण्याचे अधीक्षकांनी टाळले. या प्रकरणात अधिक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस तपासात सर्व गोष्टी उघड होतील. खूनी आणि मयत अमर नाईक याच्याशी संबंधीत अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच गोव्यात येऊन हे दोघे संशयित आणखी काय काय करीत होते याचाही तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नवेवाडेतील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवेवाडेत तीच स्विफ्ट कार घेऊन काही व्यक्ती दोन वेळा आले होते. त्यामुळे ती माणसे अमर नाईक याच्या संपर्कात होती असे दिसून येते. तिसऱया भेटीत त्यांनी अमर नाईक याचा नियोजनबद्दरीत्या खून केला. त्यासाठी संशयित खून्यांनी मालमत्ता विकत घ्यायची आहे असे आमीष दाखवून नियोजनबध्द बनावट डाव मयत अमरशी खेळला होता असे दिसून येते.

संयशितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

दोन्ही संशयितांना शुक्रवारी रात्री न्यायाधिशांसमोर उभे करून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड घेण्यात आला. पुढील पोलीस तपासातच या प्रकरणावर अधिक प्रकाश पडणार आहे. दरम्यान, मयत अमर नाईक याचा मृतदेह शवचिकित्सेनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेला असून आज शनिवारी दुपारी वास्कोत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Related Stories

तेजोपासनेतून तेजोमय संस्कृतीचे दर्शन घडवूया सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींद्वारा शुभसंदेश

Amit Kulkarni

पक्षीय पातळीवर न लढण्याचा दिला होता सल्ला

Patil_p

आंतरराज्य अकादमी क्रिकेट स्पर्धेत एम्स सावंतवाडी, आनंद क्रिकेट अकादमीचे विजय

Amit Kulkarni

पंटेमळ फ्लॅटमधील चोरीप्रकरणी वाहनचालकाला अटक

Amit Kulkarni

भिरोंडा अडवईत काजू बागायतीला आग

Amit Kulkarni

कंरझोळ चोरोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा

Amit Kulkarni