Tarun Bharat

अमेरिका ते कुडाळ, एक कोरोनानुभव

Advertisements

विनय देसाई / प्लेन्सबरो न्यू जर्सी-अमेरिका:

6 मार्च 2020..मी अमेरिकेहून विमानाने भारतात चाललो होतो. अमेरिकेसह सर्व जगातच कोरोनाची लागण सुरू झाली होती. प्रवास करणं धोक्मयाचं होतं, पण आईची प्रकृती बिघडल्यामुळे भारतात जाण्याला पर्याय नव्हता. विमानात कुणी खोकला, शिंकला की, याला कोरोनाची लागण नसेल ना?, असा प्रश्न मनात येत होता. विमान मुंबईला उतरण्याआधीच वैमानिकाने कल्पना दिली होती. आरोग्य तपासणीचे दोन फॉर्म भरून घेतले होते. विमानतळावर उतरताच प्रत्येक प्रवाशाचे तापमान पाहून त्याच्या फॉर्मवर शिक्के मारून जाऊ दिले होते. मी विमानतळावरून बाहेर पडून टॅक्सी गाठली आणि तिथून आंतर्देशीय विमानाने गोव्याला आणि पुन्हा टॅक्सी करून कुडाळला पोहोचलो. या सगळय़ा प्रवासात मला तुरळक प्रवासी व विमानतळाचे कर्मचारी मास्क लावून काम करताना दिसले, पण बहुतेकांकडे मास्क नव्हते.

देवाची प्रार्थना करीत मी घरी पोहोचलो खरा, पण एवढय़ा विमान प्रवासात कोरोनाची लागण झाली असण्याची शक्मयता मनात होतीच. घरी आलेल्या-गेलेल्या नातेवाईक/मित्रमंडळींपासून जेवढं शक्मय असेल, तेवढं अंतर ठेवून राहण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाला कोरोना व्हायरस म्हणजे काय?, तो कसा पसरतो आणि मला लागण झाली असल्याची शक्मयता समजावून सांगणे अशक्मय होतं. त्यात आईला बरं नसल्यामुळे तिचे औषध-पाणी इत्यादीची जबाबदारी टाकायला तिथे कुणी नव्हतं. पोहोचलो त्याच रात्री आईचा श्वास अडकला आणि सात-आठ शेजाऱयांना बरोबर घेऊन तिला रुग्णालयात भरती करावं लागलं. अशावेळी माझ्या आईला तुम्ही मदत करा. मी लांब उभा राहतो म्हणणे अशक्मय आणि माझ्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण तर होणार नाही ना? ही धाकधूक सतावत होती.

रात्री बारा वाजता रुग्णालयात असलेली गर्दी, माणसांना माणसे चिकटून बसलेली, सगळय़ा प्रकारचे रुग्ण आणि त्यांना मदत करायला आलेली घरची माणसं बघून माझी कोरोनाची भीती अजूनच वाढत होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढच्या दहा-पंधरा दिवसांत त्याची लक्षणं दिसतात. पण तोपर्यंत माझ्या आईला मदत करायला आलेले शेजारी आणि रुग्णालयातील रुग्ण यांना माझ्यामुळे लागण झाली, तर मी तर मरेन. पण बरोबर कोकणात ही महामारी पसरवून हजारोंचा बळी पण घेईन, हा विचार मनाला सोडत नव्हता. सोबत असलेल्या डॉक्टर मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण कुणी माझ्या शंका-कुशंकांकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत नव्हते.

रुग्णालयात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत-जात होते. माझ्या आईशेजारी ठेवलेल्या एका बाईंना खोकल्याची उबळ येत होती. एका तरुण नर्सने येऊन त्यांना ऑक्सिजन मास्क लावला. काहीवेळाने त्या बाईंना थोडे बरे वाटल्यावर नर्सने तो मास्क काढला. कागदाने थोडा पुसून घेतला व शेजारी असलेल्या दुसऱया रुग्ण बाईंना लावून टाकला. कोरोनाची माहिती अजून गावात पोहोचली नव्हती. डॉक्टर आणि नर्सना एखादा कोरोनाचा रुग्ण कसा हाताळावा हे माहीत नसावे आणि असलेच, तर असलेली उपकरणं आणि साधनं रुग्णसंख्येला अगदीच तोकडी होती. रुग्ण लोकांसाठी असलेले टॉयलेट सगळेच रुग्ण वाटेल तसे वापरत होते. एकाला झालेला रोग दुसऱयाला व्हायला अजिबात वेळ लागला नसता. कोरोनाला तर हे अक्षता देऊन आमंत्रण ठरणार होते. दुसऱया दिवशी आईला थोडे बरे वाटल्यावर मी जवळपास उचलून घरी घेऊन आलो. खोकणाऱया बाईंच्या तरुण मुलीने मला मदत करण्यासाठी माझ्या आईला एका बाजूने आधार देत रिक्षात बसवले. मी मात्र त्या तरुणीला कोरोना देईन की काय याचा विचार करत रिक्षात बसलो.

त्यानंतर पुढचे पाच-दहा दिवस भीतीत गेले. एकीकडे आईला मदत करणे जरुरी होते. गावी गेल्यावर Jet-lag मुळे पहिले काही दिवस आपल्याला बरे वाटत नाही, असे सतत वाटत राहते. झोप पूर्ण झालेली नसते, डोकं दुखतं, थोडा ताप आल्यासारखा वाटतो. यावेळी मात्र प्रत्येक त्रास हा कोरोनाचा नसेल ना? ही शंका पाठ सोडत नव्हती. आईचे काही रिपोर्ट घेऊन दवाखान्यात जावे लागले. तिथे  नेहमीप्रमाणे पन्नास-साठ रुग्ण दाटीवाटीने बसले होते. कुणी खोकत होते, कुणी शिंकत होते, कुणी तिथेच शेजारी थुंकत होते. एकावेळी चार-चार रुग्णांना एका छोटय़ाशा खोलीत घेऊन डॉक्टर तपासत होते. सुरक्षित अंतर ठेवणे काहीही करून साध्य होणारे नव्हते. डॉक्टरांनी मास्क लावला नव्हता. नर्सकडे मास्क नव्हता. रुग्णाकडे मास्क असणे शक्मय नव्हते. जगात कोरोना पसरत चालला होता. 

उरलेले बरेच दिवस घरात बसून काढले. चार-पाच दिवसांनी डोकेदुखी व ताप निघून गेला. मला, शेजारीöपाजारी किंवा घरी येऊन गेलेल्या कुणालाच आजारपण आलं नव्हतं आणि भारताने 21 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याचे घोषित केलं. त्याआधी देश सोडून बाहेर पडणे किंवा देशात अडकून पडण्याला काहीच पर्याय नव्हता. कुडाळात घरी राहायला हरकत नव्हती. पण किती दिवस?, या प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हतं आणि कुडाळात असताना कोरोनामुळे आजारी पडलो, तर तिथल्या रुग्णालयात गेलो, तर नक्की मरेन, असं वाटू लागलं होतं.

मी वीस तारखेच्या शेवटच्या विमानाने परत जायचं ठरवलं. कुडाळ ते गोवा टॅक्सी आणि गोवा-मुंबई विमानात काही अडचण येण्याची शक्मयता होती. दोडामार्गला परदेशी प्रवाशांची तपासणी होण्याची शक्मयता होती आणि काहीही लक्षणे दिसल्यास त्यांची तिथल्या रुग्णालयात रवानगी होत होती. त्यात कोरोना तपासणीचे नमुने तिथून मिरज/पुण्याला पाठवून त्याचे निकाल यायला चार-पाच दिवस सहज लागले असते. कुडाळमधल्या रुग्णालयाची अवस्था बघता, दोडामार्गला काय प्रकार असेल, याची कल्पना करवत नव्हती. एका रुग्णाचा मास्क दुसऱयाला लावला, तर एकाचा कोरोना दुसऱयाला होईल ही प्राथमिक माहिती गावात नर्सना नव्हती हे पाहून आलो होतो. भारतात डॉक्टरना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ते सांगणार आणि आपण फक्त ऐकायचे एवढाच वेळ ते आपल्याला देतात हेही अनुभवलं होतं.

देवाचं नाव घेत मुंबई गाठली. आंतर्देशीय विमानतळावर पोलीस कर्मचारी परदेशी प्रवाशांना थांबवून त्यांना आरोग्याविषयी प्रश्न विचारत होते. बहुतेक पोलिसांकडे मास्क होते. मी स्वतः कुडाळमध्ये अडीचशे रुपयाला घेतलेला एन-95 मास्क घातला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळावरही बहुतेक लोकांकडे सर्जिकल मास्क होते.

विमान सुटल्यावर हुश्श वाटले. आता पंधरा तासांच्या विमान प्रवासात कोरोना आपल्या वाटय़ाला ना येवो म्हणत विमानात बसलो. बहुतेक प्रवाशांनी मास्क लावलेले होते. विमानाचे कर्मचारी मास्क घालून होतेच. विमानात जेवणखाण दिले गेले. त्यात सलाद किंवा इतर थंड पदार्थ अपेक्षित नव्हते. जेवण हाताळणाऱया कुणालाही कोरोना झाला असेल, तर सलाद, फळाचे तुकडे इत्यादीमुळे त्याचा प्रसार होऊ शकतो, हे माहिती असूनसुद्धा ते पदार्थ ना देण्याची खबरदारी घेतली नव्हती.

अमेरिकेत उतरताना तारीख होती 21 मार्च 2020 आणि अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजला होता. विमानतळावर आरोग्याविषयी कोणतीही तपासणी केली गेली नाही. कुणाचा ताप बघितला गेला नाही, कुठे काही प्रश्न विचारले नाहीत. ‘खबरदारी बाळगा, कुटुंबियांपासून लांब राहा’, अशा साध्या सूचनाही दिल्या गेल्या नाहीत. मी नेहमीप्रमाणे पंधरा-वीस मिनिटांत बाहेर पडलो. न्यायला आलेल्या कन्या आणि बायकोची लांबून दृष्टीभेट घेऊन वाहनात त्यांच्यापासून शक्मय होईल तेवढं लांब बसलो.

घरी गेल्यावर पुढचे पंधरा दिवस एका खोलीत कोंडून घेतलं. घर मोठं असल्यामुळे एकाच घरात बायको-मुलांपासून दूर राहता आलं. प्रवासाच्या दगदगीमुळे पुन्हा आठ-दहा दिवस ताप आला. बाकी कोरोनाची काही लक्षणं नव्हती, तरीही डॉक्टरना फोन केला. कोरोनाच्या भीतीमुळे इथे डॉक्टर प्रत्यक्ष तपासत नव्हते. Video conference  च्या साहाय्याने डॉक्टरने तपासणी केली. डायबेटिस असल्यामुळे लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घ्या, असं सांगितलं. मुळात अमेरिकेत कोरोनासाठी काहीच तयारी नसल्यामुळे सरकारी यंत्रणा कोलमडली होती. कोरोनाची लक्षणे असल्याशिवाय ते तपासणी करू देत नव्हते. शेवटी एका खासगी दवाखान्यात पैसे भरून तपासणी करून घ्यावी लागली. त्यात मी कोरोनामुक्त असल्याचे दुसऱया दिवशी कळले आणि जीव भांडय़ात पडला. त्याच पंधरा दिवसांत कुडाळ पोलीस, कुडाळ नगरपंचायत आणि कुडाळ आरोग्य विभागाने घरी माणसं पाठवून अगर फोनवरून मी कोकणात नसल्याची आणि मला कोरोना व्हायरस ना झाल्याची खातरजमा करून घेतली.

21 मार्चपासून भारतात लॉकडाऊन सुरू झाला. अमेरिकेत अजूनही पूर्ण लॉकडाऊन नाही. भारतात कितीतरी लोक लॉकडाऊन पळत नाहीत. इथे अमेरिकेत बहुसंख्य लोक घरी बसले आहेत. तिथे डॉक्टर/नर्स वगैरे लोकांना
प्रशिक्षण आणि साधनेसुद्धा पुरेशी नाही आहेत. अमेरिकेत सगळे असूनही स्वतः डॉक्टर/नर्स वगैरे कोरोनाला बळी पडले आहेत. भारतात रस्त्यावर उगाच फिरणाऱया लोकांना पोलीस फटके देत आहेत. इथे मात्र तसे करता येत नाही. एक मात्र खरे की, भारतात जर हा रोग पसरला, तर तो किती कोटी लोकांचा बळी घेईल सांगता येत नाही.

नीट माहिती नसताना, साधने आणि उपकरणे नसताना, अशिक्षित जनता असताना भारतात काही शेकडो लोक या फक्त कोरोनाला बळी पडले आणि पैसे, आरोग्य व्यवस्था, प्रशिक्षण, साधने आणि शिक्षण असलेल्या अमेरिकेत मात्र हा आकडा लाखाच्या घरात पोहोचला आहे, याला भारताचे नशीब म्हणावे की, निसर्गाची कृपा हे मला तरी कळत नाही. जगातली पाचवी अर्थसत्ता असलेल्या भारत देशात आरोग्य सेवा इतक्मया अपुऱया आहेत हे पाहून वाईट वाटावे की, अमेरिकेत इतके सगळे काही असताना भारतापेक्षा वाईट परिस्थिती असावी, याबद्दल दु:ख करून घ्यावे, हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही.

Related Stories

राज्याचा टास्क फोर्स साधणार रत्नागिरी-सिंधुदुर्गातील २ हजार डॉक्टरांशी संवाद

Patil_p

वायंगणी-बागायतवाडीतील घरास आग, पिता-पुत्राचा आगीने घेतला बळी

Ganeshprasad Gogate

चिपळूण नगराध्यक्षांकडून भ्रष्टाचार?

Patil_p

क्रिडाईच्या अध्यक्षपदी नीरज देसाई

Ganeshprasad Gogate

एकाच दिवशी 31 जणांना डिस्चार्ज

NIKHIL_N

अन् एक कोटींची ‘सोने के दिल वाली’ हातची निसटली…!

Patil_p
error: Content is protected !!