Tarun Bharat

अयोध्येतून निवडणूक लढविणार योगी?

दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविणार भाजप   

वृत्तसंस्था / अयोध्या

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला आता 7 महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. राज्यातील सत्ता राखू पाहणारा भाजपही सक्रीय झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविण्याचा विचार चालविला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्या मतदारसंघाची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे.

भाजपने 2022 च्या निवडणुकीत 403 पैकी 300 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. भाजपकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग तसेच महेंद्र सिंग यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाणार असल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेचे सदस्य

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य दिग्गज देखील विधान परिषदेचे सदस्य आहेत. तसेच त्यांचा कार्यकाळही आता फारसा उरलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांचा विधान परिषदेतील कार्यकाळ सप्टेंबर 2022 पर्यंतच आहे. दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढविल्यास भागातील अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये याचा प्रभाव जाणवणार असल्याचे भाजपचे मानणे आहे.

अयोध्येवर लक्ष

मुख्यमंत्री योगी अयोध्या मतदारसंघातून 2022 ची निवडणूक लढवू शकतात. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे कौशांबीतील सिराथू तर डॉक्टर दिनेश शर्मा यांना लखनौ पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी मिळू शकते. अशाचप्रकारे कॅबिनेटमंत्री महेंद्र प्रताप सिंग यांना प्रतापगढ येथली कुंडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग  बुंदेलखंडमधील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

योगींसाठी जागा सोडण्याची तयारी

रामनगरी अयोध्येचे आमदार मुख्यमंत्री योगींसाठी स्वतःचा मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत. योगींसाठी स्वतःचा मतदारसंघ आनंदाने सोडण्यास तयार असल्याचे भाजप आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 18 सप्टेंबर 2017 पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.

विरोधी पक्षांची तयारी

केवळ भाजपकडून तयारी होतेय अशी स्थिती नाही. विरोधी पक्ष म्हणजेच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस देखील निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहे. प्रियंका वड्रा यांनी उत्तरप्रदेशचे दौरे सुरू केले आहेत. तर अखिलेश यादव पुन्हा कार्यकर्त्यांशी नाळ जोडू पाहत आहेत. बसपकडून आता ब्राह्मण संमेलनांचे आयोजन होणार आहे.

Related Stories

वन रँक वन पेन्शनप्रकरणी केंद्र सरकारची बाजू योग्य

Patil_p

कुप्रसिद्ध फ्रेंच सिरीयल किलर चार्ल्स शोभराज याची होणार सुटका

Abhijeet Khandekar

अमृतसरमध्ये रुग्णालयात आग, 650 रुग्णांची सुटका

Patil_p

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Amit Kulkarni

हज यात्रेकरूंसाठीचा व्हीआयपी कोटा समाप्त

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 1,617 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar