माडखोल धवडकी शाळा नं. २ चे प्रयोग व उपक्रमशील शिक्षक
ओटवणे / प्रतिनिधी:
माडखोल धवडकी शाळा नं. २ चे प्रयोग व उपक्रमशील शिक्षक अरविंद नारायण सरनोबत याना कोल्हापूर येथील अविष्कार सामाजिक व शैक्षणिक फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
अविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आदर्शवत शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव करण्यात येतो. अरविंद सरनोबत यांनी आपल्या एकोणीस वर्षाच्या शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय व गौरवास्पद कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास विकासासाठी त्यांनी शाळेमध्ये गुणात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असे चौफेर उपक्रम राबवविले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम बी शेख, चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ भारत खराटे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे, अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, सौ उज्वला सातपुते, सौ सोनाली कपूर, सुचेता कलाजे आदी मान्यवर उपस्थित होते.