Tarun Bharat

अरुंधती चौधरी उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्व युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर अरुंधती चौधरीने 69 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्याचप्रमाणे भारताच्या अन्य तीन स्पर्धकांनी आपल्या वजनगटातून सलामीच्या जिंकल्या लढती आहेत. या स्पर्धेतील गुरुवारचा तिसरा दिवसही भारतीय स्पर्धकांना समाधानकारक गेला आहे.

या स्पर्धेत गुरुवारी पुरुष विभागात भारताच्या विकास (52 किलो गट) आणि अर्शी खानम (54 किलो गट) यांना दुसऱया फेरीतील लढतीमध्ये हार पत्करावी लागली. खेलो इंडिया स्पर्धेत तीनवेळा सुवर्णपदक मिळविणारी भारताची महिला मुष्टीयोद्धी अरुंधती चौधरीने 69 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरी गाठताना कोलंबियाच्या जेरेझचा 5-0 अशा गुणांनी पराभव केला. अरुंधती चौधरीची उपांत्यपूर्व फेरीची लढत युक्रेनच्या ऍना सेकोशी होणार आहे. सेकोला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

पुरुषांच्या विभागात 54 किलो वजन गटात भारताच्या आकाशने जर्मनीच्या क्लिसेचवर पहिल्या फेरीच्या लढतीत 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला होता. आकाशची दुसऱया फेरीतील लढत मंगोलियाच्या गनबातारशी होणार आहे. 69 किलो वजन गटात भारताच्या सुमितने स्लोव्हाकियाच्या लॅडीस्लेव्हवर मात केली. महिलांच्या विभागात भारताच्या गीतिकाने रशियाच्या इरमाकोव्हावर मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या विभागात 52 किलो वजन गटात मंगोलियाच्या इ. सुकबातने भारताच्या विकासचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला तर 54 किलो वजन गटात उझ्बेकच्या निगीनाने भारताच्या अर्शी खानमवर 4-1 अशी मात करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा 20 जणांचा संघ सहभागी झाला आहे. 52 देशांच्या 414 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

Related Stories

कसोटीचेही नेतृत्त्व रेहितकडे

datta jadhav

लंका-पाक कसोटी मालिका बरोबरीत

Amit Kulkarni

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ विजय

Patil_p

सीएबीच्या अध्यक्षपदासाठी गांगुलीचे प्रयत्न

Amit Kulkarni

पाकला विजयासाठी 120 धावांची गरज

Patil_p