Tarun Bharat

अर्जेन्टिना दौऱयात भारताचा पहिला पराभव

तिसऱया सराव सामन्यात यजमानांचा निसटता विजय

वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स

अर्जेन्टिना दौऱयात भारताच्या पुरुष हॉकी संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. येथे झालेल्या तिसऱया सराव सामन्यात यजमान अर्जेन्टिनाने भारतावर 1-0 अशी निसटती मात करीत प्रो हॉकी लीगमधील पराभवाची परतफेड केली. एकमेव विजयी गोल लुकास टोस्कानीने आठव्या मिनिटाला नोंदवला.

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये दोन्ही सामन्यात भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाचा पराभव केला होता. त्यातील पहिला सामना 2-2 अशा बरोबरीनंतर भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला होता तर दुसरा सामना 3-0 असा एकतर्फी जिंकला होता. येथील तिसऱया सराव सामन्यात भारताने ललित उपाध्याय व राजकुमार पाल यांनी अर्जेन्टिनाच्या सर्कलपर्यंत आगेकूच करीत चांगली सुरुवात केली. पण अर्जेन्टिनाने भक्कम बचाव करीत आपल्यावरील धोका टाळला होता. नंतर अर्जेन्टिनाच्या आघाडी फळीने शिस्तबद्ध आक्रमण करून यश मिळविले. लुकास टोस्कानीने त्यांना हे पहिले व एकमेव यश मिळवून दिले. पुढच्याच मिनिटाला भारताच्या आघाडी फळीतील शिलानंद लाक्रा व मनदीप सिंग यांनी गोलच्या संधी निर्माण केल्या होत्या. पण अनुभवी गोलरक्षक जुआन मॅन्युअल विवाल्डीला ते चकवू शकले नाहीत.

दुसऱया सत्रात भारताचा गोलरक्षक कृशन पाठकने अप्रतिम गोलरक्षण करीत काही गोल वाचवले. पाठकने आंतरराष्ट्रीय स्तरावर सामन्यांचे अर्धशतक प्रो हॉकी लीगमधील दुसऱया सामन्यातच गाठले आहे. त्या सामन्यात त्याला सर्वोत्तम खेळाडूचा बहुमानही मिळाला होता. या तिसऱया सामन्यातही त्याने तो आत्मविश्वास कायम राखला आणि अर्जेन्टिनाला आघाडी वाढविण्यापासून रोखले होते. तिसऱया सत्रातील पहिल्याच मिनिटाला भारताने उत्तम संधी निर्माण केली. डिफेंडर सुरेंदर कुमारने भारतासाठी पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारताच्या ड्रगफ्लिकर्सना त्याचा लाभ घेता आला नाही. 43 व्या मिनिटाला अर्जेन्टिनानेही पीसी मिळविला होता. पण पीआर श्रीजेशने त्यांना त्यावर यश मिळू दिले नाही. शेवटच्या सत्रात भारताने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, मनदीप सिंग यांनी गोलपर्यंत धडक मारली होती. पण अर्जेन्टिनाने भक्कम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही.

Related Stories

अफगाण क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी जोनाथन ट्रॉट

Patil_p

राष्ट्रकुल टी-20 स्पर्धेसाठी भारतासह सहा महिला संघ पात्र

Patil_p

स्पोर्ट्स mania

Amit Kulkarni

पाक महिला क्रिकेट संघाला अक्रम, आझम यांचे मार्गदर्शन

Patil_p

इंग्लंडचा लंकेवर मालिका विजय

Amit Kulkarni

विल्यम्सनच्या नाबाद द्विशतकाने न्यूझीलंडला आघाडी

Amit Kulkarni