Tarun Bharat

अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी रिफायनरी हवीच : प्रमोद जठार

वार्ताहर/ राजापूर

कोरोनामुळे राज्यातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसविण्याची ताकद रिफायनरी प्रकल्पामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या तज्ञांच्या कमिटीनेही हे मान्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असे आवाहन भाजपाचे राज्य सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता तरी डॉक्टरांचे ऐकावे कंपाऊंडरचे नाही असे म्हणत त्यांनी थेट नाव न घेता खासदार विनायक राऊत यांची खिल्ली उडविली. रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांसह रत्नागिरीचे पालकमंत्रीही अनुकूल असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

भाजपाने सिंधुदुर्ग जिल्हा व दक्षिण रत्नागिरी प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविल्यानंतर पहिल्यांदाच राजापूरात आलेल्या माजी आमदार जठार यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर, विजय केळकर अशा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमली आहे. या समितीने नुकताच मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये रोजगार आणि राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणायची असेल तर रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा गांभियाने विचार करावा, असे आवाहन जठार यांनी केले आहे.

रिफायनरी प्रकल्प होणार यात कोणतीही शंका नाही. हा प्रकल्प आता कोणत्याही पक्षाचा राहिलेला नाही, तो जनतेचा प्रकल्प झाला आहे. जनता यासाठी आग्रही असून समर्थनाचा वणवा आता विस्तारत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जनतेचे मत ऐकले नाही, तर हे शासनच राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रकल्प झाल्यानंतर स्थानिकांना नोकऱया मिळाव्यात याकरीता आतापासूनच त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी आपण आरआरपीसीएल कंपनीकडे केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 10 हजार मुलांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येणार असून याकरीता अर्ज भरून घेण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. राजापूर व देवगड तालुक्यातील तरूणांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त तरूणांनी यामध्ये नोंदणी करावी, असे आवाहनही जठार यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री, लोकसभेतील सेना खासदार, महाराष्ट्रातील शिवसैनिक रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. केवळ खासदार विनायक राऊत या प्रकल्पामध्ये आडकाठीचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे बरोजगार तरूण, तरूणींच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी खासदार राऊत यांना सुबुध्दी येऊदे, असा टोला जठार यांनी यावेळी बोलताना लगावला. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, मोहन घुमे, महिला पदाधिकारी श्रृती ताम्हणकर, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, सुरज पेडणेकर, सिंधुदुर्गचे बाळा खडपे आदी उपस्थित होते

Related Stories

अमित शहा उद्या सिंधुदुर्गात

NIKHIL_N

गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त

Tousif Mujawar

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले

Archana Banage

चिपळुणात 75 हजाराचा गुटखा जप्त

Patil_p

शाळेचा गुणत्मक दर्जा टिकविल्याचा आनंद!

NIKHIL_N

श्याम चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनकार पुरस्कार

Anuja Kudatarkar