Tarun Bharat

अर्शदीप-चहरसमोर द.आफ्रिकेची दाणादाण

Advertisements

यजमान भारतीय संघ 8 गडय़ांनी विजयी, जसप्रित बुमराह पाठदुखीमुळे पुन्हा संघातून बाहेर

वृत्तसंस्था/ थिरुवनंतपूरम

अर्शदीप सिंग व दीपक चहर या रिझर्व्ह सीमर्सनी भेदक स्विंग गोलंदाजी साकारत एकत्रित 5 बळी घेतल्यानंतर भारताने येथील पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाचा 8 गडी राखून फडशा पाडला. भारताने प्रारंभी द. आफ्रिकेला 8 बाद 106 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखून धरले आणि प्रत्युत्तरात 16.4 षटकात 2 बाद 110 धावांसह सहज विजय संपादन केला. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडी मिळवली. 

 जसप्रित बुमराह पुन्हा एकदा पाठदुखीमुळे संघाबाहेर फेकला गेल्यानंतर भारतासमोर कडवे आव्हान होते. पण, अर्शदीप व दीपक चहर यांनी भेदक मारा साकारत अनपेक्षित यश मिळवून दिले.

डावखुऱया अर्शदीप सिंगने 4 षटकांचा कोटा पूर्ण करत 32 धावात 3 बळी घेतले तर दीपक चहरने देखील त्याला समयोचित साथ देत 4 षटकात 24 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. चेंडू दोन्ही बाजूंनी उत्तम स्विंग करताना त्याने उसळत्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेतला.

प्रारंभी, तेम्बा बवूमा (0) चहरच्या स्विंगवर चकला. चहरचे काही आऊटस्विंगर खेळताना बवूमा बराच झगडला. नंतर बनाना इनस्विंगरवर त्रिफळा उडाल्याने बवूमा कमनशिबी ठरला. अर्शदीपने चेंडू बाहेर काढण्यात उत्तम यश मिळवताना क्विन्टॉन डी कॉकचा (1) त्रिफळा उडवला. डावखुऱया रिली रॉस्यूला (0) वाईड आऊटस्विंगर छेडण्याची बाद होण्याच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली. 

पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना जवळपास हातातून निसटला होता. एडन मॅरक्रम (24 चेंडूत 25), वेन पर्नेल (37 चेंडूत 24), केशव महाराज (35 चेंडूत 41) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता.

संक्षिप्त धावफलक

द. आफ्रिका ः 20 षटकात 8 बाद 106 (केशव महाराज 35 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 41, एडन मॅरक्रम 24 चेंडूत 25, वेन पार्नेल 37 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 24. अवांतर 6. अर्शदीप सिंग 4 षटकात 32 धावात 3 बळी, दीपक चहर 4 षटकात 2-24, हर्षल पटेल 4 षटकात 2-26, अक्षर पटेल 4 षटकात 1-16).

भारत ः 16.4 षटकात 2 बाद 110 (केएल राहुल 56 चेंडूत नाबाद 51, सूर्यकुमार यादव 33 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 50).

चौफेर फटकेबाजीसह सूर्यकुमारचा अर्धशतकी झंझावात

भारताचा मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत झंझावाती अर्धशतक साजरे केले. सूर्यकुमार यादवने 33 चेंडूत जलद 50 धावा फटकावल्या. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही खेळपट्टी टी-20 सामन्याला अनुकूल नाही, असे मत मांडले होते. दोन्ही संघातील बहुतांशी फलंदाज या खेळपट्टीवर झगडले देखील. पण, सूर्यकुमारचे इरादे मात्र औरच होते. त्याने नोर्त्झेच्या गोलंदाजीवर शानदार फ्लिकच्या फटक्यावर थर्डमॅनकडे षटकार खेचला तर नंतर केशव महाराजच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअरलेगकडे आणखी एक षटकार फटकावत आपले बुलंद इरादे सुस्पष्ट केले.

प्रारंभी, विजयासाठी 107 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (0), विराट कोहली (3) स्वस्तात बाद झाल्याने भारताला जोरदार धक्के बसले. त्यातच केएल राहुलने बचावात्मक पवित्र्यावर भर दिल्याने भारताची धावगती आणखी मंदावली. पण, सूर्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे नंतर या सामन्याचे सर्व चित्र पूर्ण पालटले आणि भारताने सहज विजय संपादन केला.

अन् पहिल्या 3 षटकांच्या पडझडीतून आफ्रिकन संघ शेवटपर्यंत सावरला नाही!

पॉवर प्लेच्या प्रारंभिक षटकात संघाचे प्रदर्शन कसे होते, यावर बरेच काही अवलंबून असते. दक्षिण आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर प्रारंभी हाराकिरी केली आणि यामुळे जो धक्का सोसावा लागला, त्यातून ते अखेरपर्यंत सावरु शकले नाहीत! अश्विन (4 षटकात 0-8), अक्षर पटेल (4 षटकात 1-16) व हर्षल पटेल (4 षटकात 2-26) यांनाही प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखण्यात उत्तम यश आले.

जेव्हा 15 चेंडूत द. आफ्रिकेचा निम्मा संघ 9 धावात तंबूत परतला!

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि पहिल्या 15 चेंडूतच भारतीय गोलंदाजांनी रोहितचा हा निर्णय 100 टक्के सार्थ ठरवला. आफ्रिकन डावाला प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या 15 चेंडूतच त्यांचे चक्क 5 फलंदाज स्वस्तात बाद होत राहिले. सलग पडझडीमुळे त्यांची पाहता पाहता 5 बाद 9 अशी दाणादाण उडाली.

Related Stories

ट्रेलब्लेझर्सचा व्हेलॉसिटीवर सहज विजय

Patil_p

बांगलादेशच्या फलंदाज प्रशिक्षकपदी सिडॉन्स

Amit Kulkarni

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू पोरे कालवश

Patil_p

तडाखेबंद सलामीनंतर मुंबईची घसरगुंडी

Patil_p

पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध क्लीन स्वीप

Patil_p

सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p
error: Content is protected !!