Tarun Bharat

अलीकडील हवामान अंदाजात अचूकता

हवामान विभागाचे अंदाज पूर्वीप्रमाणे राहिलेले नसून त्यामध्ये अचूकता येऊ लागली आहे. मात्र पावसाच्या अंदाजाचे गणित समजून घेताना हवामान विभागाकडून अधिक लोक जागरूकतेची अपेक्षा केली जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

मुंबईसारख्या शहरात पाऊस पडला किंवा नाही पडला तरी त्याचे महत्त्व नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया ठाणे जिह्यात पाऊस झाल्यास मुंबईकर सुखावतो.  मुंबईकरांना पाऊस भिजवण्याइतपत पडला तरी पुरेसा असतो. अन्यथा 100 मिमीहून एक मिमी जरी अधिक पडला तरी बाधा ठरू शकतो. जून महिन्याच्या सुरुवातीला दणक्यात आगमन झालेला पाऊस ठाणे जिह्यातील तलाव क्षेत्रात धारदार कोसळला. त्यामुळे शहरवासीय सुखावत असतानाच पावसाने दडी मारल्याचे चित्र समोर आले. मग मात्र पालिकेच्या तलाव क्षेत्रातील जलसाठा शहराला 70 दिवस पुरेल अशा बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा पावसाची पुन्हा गरज वाटू लागली. मागच्या मंगळवारपासून ओढ खाल्लेला पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आणि पुन्हा हवामान अंदाजाकडे कान टवकारले जाऊ लागले. गेले दोन दिवस मुंबईत पावसाचे वातावरण दिसू लागले. यात उपनगरे आघाडीवर होती. तसे पाहिल्यास जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने पवई तलाव आणि तुलसी तलाव काहीसा भरून गेला. म्हणजेच मोसमी पावसाची मुंबईतील एंट्री दमदार होती. यंदा पावसाचा अंदाज 96 टक्क्यांचा आहे. मुंबईसारख्या शहरांना पाऊस अंदाज टक्क्यांवर सांगून चालत नाही, तर तो आगामी तासाभरात किती असू शकतो अशा अंदाजात हवा असतो. मुंबई वेध शाळा दीर्घकालीन (लॉन्ग टर्म) आणि अंशकालीन (शॉर्ट टर्म) असे दोन्ही अंदाज तासातासाने देत असते. मात्र तो अंदाज तंतोतंत खरा न ठरल्यास मात्र हवामान विभागाची चेष्टा केली जाते. या ठिकाणी पावसाच्या अंदाजाचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाचा अंदाज हा शास्त्राrय आणि आतापर्यंत झालेल्या पावसाच्या उपलब्ध माहितीच्या  निकषावर करण्यात आलेला असतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस होत असताना त्या ठिकाणावरील पाऊस पूरक स्थानिक घटकसुद्धा अनुकूल असावे लागतात. स्थानिक अनुकूल घटकांमध्ये डोंगर, झाडे, वाऱयाची स्थिती आदी मुद्दे येतात. विभागाकडून वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस होईलच असे होत नाही.

भांडुप-पवई-मुलुंड-बोरिवली अशा ठिकाणी पडणारा पाऊस अंदाजापेक्षा अधिक होऊ शकतो किंवा अंधेरी-कुर्ला-चेंबूर याठिकाणी पाऊस अंदाजापेक्षा कमीदेखील होऊ शकतो. विविध घटकांवर पावसाची तीव्रता आणि सौम्यता अवलंबून असते. बोरिवलीसारख्या उपनगरात पश्चिमेकडील वाऱयाची तीव्रता अधिक असते. तर घाटकोपर, कुर्लासारख्या ठिकाणी पश्चिमी वारे त्या वेगाने आणि बाष्पयुक्त असेलच असे होत नाही. पाऊस अंदाजात वाऱयाची दिशा ज्याप्रमाणे लक्षात घेतली जाते, तसेच इतरही घटक आहेत, ज्यावर कमी वेळेतील अंदाज वर्तविण्यात येतात. मुंबईत शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे, हार्बर उपनगरे या चारही ठिकाणी वेगवेगळी स्थानिक हवामान स्थिती आहे. या स्थानिक स्थितीनुसार वातावरणीय स्थिती बदलती राहते यावर हवामान तज्ञ ठाम आहेत. त्याचप्रकारे राज्यात देखील हवामान खात्याकडून विभाग केले आहेत. जसे उत्तर कोकण, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आदी विभागातील स्थानिक स्थिती त्या त्या विभागानुसार आहे. गेल्याच आठवडय़ात 9 ते 10 जुलै दरम्यान उत्तर कोकणाला येलो अलर्ट घोषित होता. तर 10 ते 12 जुलै दरम्यान दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट घोषित केला होता. त्याप्रमाणे दक्षिण कोकणात सध्या पाऊस पडत आहे. एखाद्या वेळी अंदाज चुकल्यास हवामान विभाग चुकीचा आहे असे  म्हणणे योग्य ठरणार नाही. सध्याची सतत बदलती वातावरणीय स्थिती याला कारणीभूत असल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत. हवामान विभाग आपल्या मर्यादा ओलांडून आगामी काही तासात अंदाज वर्तवित आहेत.

सध्या अंदाज वर्तविण्याची क्षमता 100 पटीने सुधारली असल्याचे मत हवामान विषय अभ्यासक शंतनू पाटील यांनी व्यक्त केले. पावसाचा अंदाज पावसाच्या ठरलेल्या मॉडेलवर अवलंबून असतो. ईएफएस आणि ईपीएमडब्लूएफ ही दोन मॉडेल प्रचलित आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभाग हे देशापुरते मर्यादित नसून जागतिक पातळीवरील माहितीचा अभ्यास करून अंदाज वर्तविला जातो. मात्र मॉडेलच्या अंदाजानुसार हवामान असेलच असेही नाही. प्रत्येक घटकेला हवामानात काहीतरी बदल होत असतो. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचेही हवामानतज्ञ सांगतात. हवामान संदर्भ सतत बदलते असल्याने दीर्घकालीन किंवा थोडय़ा कालावधीसाठी केलेल्या अंदाजाप्रमाणे घडेलच याची खात्री हवामान तज्ञही देत नाहीत. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र स्वरूपाचा नाही किंवा सौम्यदेखील नाही. त्यामुळे पाऊस मध्यम स्वरूपात राहील असा अंदाज आहे. दरम्यान पावसाचे अंदाज अधिक तंतोतंत वर्तविण्यासाठी हवामान विभागाने बहुतांश ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे पाऊस, वारा, आर्द्रता तसेच कमाल-किमान तापमान याची क्षणोक्षणीची माहिती मिळणार आहे. ही सांख्यिकी माहिती अधिक चांगल्या प्रकारे जोडून पाऊस अंदाजाला बळकटी मिळणार आहे. मुंबई शहरात 70 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असून राज्यभर ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. नाशिक, निफाड आदी ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स सुरू झाली आहेत.

राम खांदारे

Related Stories

आता नोकरीसाठी इतर शहरातील उमेदवारांना प्राधान्य

Patil_p

आत्मनिर्भर

Patil_p

नवरत्नांची माळ

Patil_p

स्वतःच्या जीवापेक्षा भगवंतांवर प्रेम करणं हीच खरी भक्ती

Patil_p

स्थलजलभ्रांति झाली पाहीं

Patil_p

किं करिष्यति वक्तारः…(संस्कृत सुवचने)

Patil_p