टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा हे देशातील उद्योगपतींपैकी एक आहेत. साधेपणा आणि दिलदारपणामुळे ते अनेकदा चर्चेत असतात. मात्र, आता त्यांचे धाकटे बंधू जिमी हे अविश्वसनीय आणि अकल्पनीय गुणांमुळे प्रकाशझोतात आले आहेत. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी नुकतीच ट्विटरवर जिमी टाटा यांच्यासंबंधी एक पोस्ट टाकल्यानंतर ट्विट-री-ट्विटचा पाऊसच सुरू झाला आहे.


हर्ष गोएंका यांनी जिमी टाटाच्या मुंबईतील कुलाबा येथील 2 बीएचके फ्लॅटचा फोटो शेअर केला आहे. जिमी टाटा यांची ओळख करून देताना त्यांनी “रतन टाटा यांचा धाकटा भाऊ जिमी टाटा यांच्याबद्दल माहिती आहे का? ते मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात’’ असे लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे रतन टाटा यांना एक भाऊ असून तो अतिशय साधेपणाने जगत असल्याची माहिती सर्वांसमोर आली आहे. रतन टाटा यांच्या भावाच्या घराचा फोटो समोर आल्यानंतर ट्विटरवर लोक त्यांच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. हर्ष गोएंका यांच्या ट्विटला 9 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक तर 600 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे.
जिमी टाटा हे प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत. 1990 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटाच्या विविध कंपन्यांमध्ये काम केले. ते टाटा सन्स आणि इतर टाटा कंपन्यांमध्ये भागधारक आहेत. ते रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत. ते कधीही मोबाईल वापरत नसले तरी टाटा समूहातील प्रत्येक घडामोडीची त्यांना माहिती असते. तसेच ते ‘वर्तमानपत्रप्रिय’ही आहेत. रतन टाटा यांच्याप्रमाणेच जिमी टाटादेखील बॅचलर आहेत.