ऑनलाईन टीम / पाटणा :
लोक जनशक्ती पक्षामध्ये काका-पुतण्यांमध्ये सुरू असलेल्या तुंबळ राजकीय युद्धामध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि त्यांचे काका, दिवंगत रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांच्यामध्ये पक्षात उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर आता चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडे घातले आहे.


ते म्हणाले, हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय, यामध्ये त्यांनी स्वत:ला हनुमार म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना रामाची उपमा दिली आहे. पुढे ते म्हणाले, मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत, असे चिराग पासवान म्हणाले आहेत.


मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना, असे देखील चिराग पासवान यावेळी म्हणाले आहेत.
- तेजस्वी माझे लहान बंधू : चिराग
माझे वडिल आणि लालू प्रसाद यादव हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आमची घट्ट मैत्री होती. ते माझे लहान बंधू आहेत. जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आघाडीसंदर्भात पक्ष अंतिम निर्णय घेईल, असे सूतोवाच देखील चिराग पासवान यावेळी केले आहेत.