Tarun Bharat

अशोकराव भावके यांचे अपघाती निधन

वार्ताहर/ उंडाळे

घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके (वय 52) यांचे अपघाती निधन झाले. कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते महामार्गावर उभे राहिले असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचे अपघाती निधन झाले. 

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, घोगाव येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या समोर कराड-रत्नागिरी महामार्गावर अशोकराव भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. या हॉटेलसमोर मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावर उभे होते. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते महामार्गावर डांबरी रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना निदर्शनास येताच त्यांच्या हॉटेलमधील लोकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी   कृष्णा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

  दरम्यान, याबाबतची माहिती तालुक्यासह जिल्हाभरात पसरली. त्यानंतर अनेक शिवसैनिकांसह नातेवाईकांनी  रुग्णालयाकडे धाव घेतली.  गुरुवारी 17 रोजी घोगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कराड दक्षिणेत भगवा झळकला. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 1995 साली आशोकराव भावके यांनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात 1995 मध्ये पहिल्यांदाच भावके यांनी काँग्रेसच्या स्व.  विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी कराड दक्षिणमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण करत अनेक गावांत भगवा झळकवला. परंतु, त्यांना यश आले नाही. मात्र, या निवडणुकीनंतर ख्रया अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली. 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना 

अशोकराव भावके यांनी 1995 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी अल्पावधीतच घोगाव येथे त्यांच्या जन्मगावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमधून आतापर्यंत घोगाव, उंडाळे, येळगाव, शेडगेवाडी भागातील अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगची पदवी संपादन केले आहे. 

काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहून त्यांनी पुणे आणि मुंबई येथे बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जात होते. काल (मंगळवारी) रात्री ते घोगाव येथे आले होते. रस्त्याच्याकडेला उभे राहिले असताना त्यांना कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून वेगाने तपास

अशोक भावके हे कराडसह पुणे, मुंबईत संपर्क असणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांना रस्त्यावर कारने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. ज्या कारने भावकेंना धडक देऊन पसार झाली. त्या कारचा कराड पोलीस शोध घेत असून त्यासाठी एक स्वतंत्र पथक रवाना झाले आहे. दरम्यान भावके यांचा अपघात झाला की घातपात याबाबत परिसरात चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत नेमका उलगडा गुरूवारपर्यंत होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

निवडणुकीमुळे लोणंदच्या ढाब्यांवर तळीरामांचा अड्डा

Patil_p

वडूज येथे पाच लाखाची दारू जप्त

Patil_p

टाकाऊ वस्तूंपासून पालिकेने साकारला हत्ती

Patil_p

शिवतीर्थवरील मेघडंबरीच्या कामास सुरुवात

Patil_p

राजमातांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे स्ट्रप्चर उभारण्यासाठी चर्चा करुन केली पाहणी

Amit Kulkarni

जिह्यात आज सिमोल्लंघन

Patil_p