Tarun Bharat

असा वाढवा आत्मविश्वास

कोणत्याही यशात आत्मविश्वासाचा 80 टक्के वाटा असतो असे म्हटले जाते. म्हणूनच कित्येकांनी आपली कामे नाकारली असतानाही केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर तेच काम उत्तम असल्याचे मांडून यशाच्या शिखरावर पोहचलेल्यांची संख्या प्रत्येक क्षेत्रात बरीच मोठी आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्रियांनी सर्वप्रथम आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपल्याकडे मुलींना  अनेक वेळा बोलताना गप्प बसवले जाते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसण्याजोगे वर्तन करून त्यांचे पाय मागे खेचले जातात. अन्यथा ‘अति शहाणी,’ ‘भलतीच हुशार’  वगैरे शेलकी विश्लेषणे तिला ऐकवली जातात. गंमत म्हणजे ही विशेषणे देण्यात महिलाच आघाडीवर असतात. म्हणजे मुलींनी शिकावे, काम करावे, सगळ्या क्षेत्रांत चमकावे परंतु त्यांनी आत्मविश्वासाने चारचौघांत वागू नये अशी काहीशी विसंगत अपेक्षा अद्यापही अनेक ठिकाणी दिसते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांनी यासाठी स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे.  आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टी नक्कीच करता येतात.

1. आयुष्यात प्रयोग करून बघा : काही तरी वेगळे करून पहा. रात्रीच्या जेवणाला एकटीने जा. कोणत्या तरी वेगळ्या विषयाच्या क्लासला जा. टोस्टर किंवा मोबाईल दुरुस्ती करायला शिका. काहीतरी नवीन गोष्ट साध्य करण्याने आत्मविश्वास वाढतो.

2. कृती आराखडा तयार करा आणि त्याची अंमलबजावणी करा : वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनातील एखादे क्षेत्र निवडा आणि त्यात तुम्हाला कुठंपर्यंत पोहचायचे आहे, कितपत प्राविण्य प्राप्त करून घ्यायचे आहे ते ठरवा. त्यानुसार एक कृती आराखडा तयार करा आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा. त्याच्या वेळा निश्चित करा. वेळापत्रकाप्रमाणे आपली प्रगती होते आहे की नाही ते तपासा. प्रत्येक छोटय़ा पायरीवर मिळवलेले यश तुमच्या
आत्मविश्वासात मोठीच भर घालेल.

3. आव्हाने पेला : नवनवीन आव्हाने घ्या आणि ती पेलण्याचे आपले प्रयत्न जिद्दीने सुरूच ठेवा. काही वेळा अपयशही येईल. परंतु त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. एका यशाने आत्मविश्वास येतो आणि एका अपयशाने तो जातो असे होत नाही. त्यामुळे
आत्मविश्वासाने पुढे जात रहा. आपण आपल्यावर विसंबून एकटीनेही बरेच काही करू शकतो असा विश्वास तुम्हाला आला की छोटय़ा – मोठय़ा अपयशांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढे जात राहू शकाल.

4. मार्गदर्शक शोधा : एकापाठोपाठ एक आव्हाने पेलून सतत पुढे पुढे जात राहणारी एखादी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? जर असेल, तर तिच्या कामाची पद्धत पाहण्याचा प्रयत्न करा. ती कशी पुढे जाते, अडथळ्यांवर कशी मात करते. धोके कसे पत्करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाउमेद न होता नवीन प्रयत्न ती कशा प्रकारे सुरू करते ते पहा. त्यामुळे तुम्हाला बर्याच नव्या गोष्टी समजतील. आपल्या वागण्याची तिच्या वागण्याशी तुलना करा. आपण त्या परिस्थितीत कशा वागलो असतो त्याचा विचार करा. स्वतःला कमी लेखू नका. परंतु ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

बहुतेक आत्मविश्वासू लोक हे दुसर्याला तत्परतेने मदत करतात. कारण आपल्या यशापर्यंत पोहचण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे त्यांना माहिती असते. त्यांनाही कोणी तरी मदत केलेली असतेच. तेव्हा त्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेत रहा.

एका पाठोपाठ एकेक गुण आत्मसात करत रहा आणि त्याचा वापर करून पाहण्याची एकही संधी सोडू नका. कारण त्यामुळेच तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे; हे लक्षात घ्या.

Related Stories

थंडीत घ्या हृदयाची काळजी

Omkar B

जादू फॅसिअल स्टिमची

Amit Kulkarni

नोकरी बदलताय?

Omkar B

मुकाबला सायबर स्टॉकिंगचा

Amit Kulkarni

जुन्याला द्या नवं रुप

Omkar B

सून संतापी आहे… काय करु?

tarunbharat