प्रतिनिधी / निपाणी :
अमेरिका व इराणमधील संघर्षाचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच या दोन्ही देशादरम्यान अद्यापही तणावजन्य परिस्थिती असल्याने सोन्याचे दर अस्थिर राहिले आहेत. या अस्थिरतेमुळे निपाणी बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. सोने दरातील ही चढ-उतार आगामी लग्न सराईच्या हंगामासाठी चिंताजनक असल्याचे मानले जात आहे.
मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरतेमुळे शेअर बाजारातही घसरण होत आहे. याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱया सोन्याला पसंती देत आहेत. यामुळे सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. निपाणी सराफ बाजारपेठेतही गेल्या आठवडय़ात प्रतितोळा 38 हजार 800 रुपये असणारे सोने दोनच दिवसात वाढून तब्बल 42 हजार 400 रुपयांपर्यंत पोहोचले. परिणामी सोन्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने याचा परिणाम लग्नसराईवर होण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत अमेरिका-इराणमध्ये तणाव असला तरी गेल्या दोन दिवसात युद्धजन्य अशा हालचाली झालेल्या नाहीत. याचा परिणाम म्हणून गुरुवारी सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण होऊन निपाणीत प्रतितोळा 41 हजार रुपये या दराने सोने विक्री होत होती. असे असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्यापही अस्थिरता असल्याने सोन्याचे दर आणखी वाढण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
वर्षभरात 8 ते 9 हजारांची वाढ
दरम्यान गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सोन्याचा दर हा 32 हजार ते 32 हजार 500 प्रतितोळा असा होता. मात्र वर्षभरात तब्बल 8 ते 9 हजार रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून सामान्य कुटुंबांना घरगुती कार्यक्रम तसेच अन्य कारणांसाठी सोने खरेदी करणे अशक्य होत चालले आहे.