Tarun Bharat

अस्वस्थ वर्तमानाची आर्त साद

‘कोरोना’च्या दुसऱया लाटेने आता जवळपास संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतले आहे. वेगाने पसरलेल्या या आपत्तीबाबत ‘इंडिया टास्क फोर्स’ आयोगाने ‘भारतातील दुसऱया कोरोना लाटेचे व्यवस्थापनः तातडीचे उपाय’ हा अहवाल जगविख्यात ‘लॅन्सेट’ वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक घातक असल्याचे, अनेक वैद्यकीय सबळ पुरावे एव्हाना समोर आले आहेत. फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवडय़ात देशभरात नवीन कोरोनाबाधितांची संख्या 11,794 होती आणि 116 मृत्यु झाले होते. 10 एप्रिल 2021 रोजी नवीन कोरोनाबाधितांचा आकडा 1,52,565 पर्यंत पोहोचला आणि 838 मृत्यु झाले. (21 एप्रिल 2021 पर्यंत नवीन कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे आणि मृत्युचे प्रमाण दोन हजारांच्यावर पोहोचले आहे) नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वांधिक (84.61%) रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि मध्यप्रदेशात आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये, 10 एप्रिलपर्यंत कोरोना बाधितांचे प्रमाण 2.8% हून 10.3% पर्यंत झपाटय़ाने वाढले. सप्टेंबर 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. पहिल्या लाटेमध्ये रुग्णांचे प्रमाण दहा हजाराहून ऐंशी हजारापर्यंत पोहोचण्यास 83 दिवसांचा कालावधी लागला होता. दुसऱया लाटेमध्ये 40 दिवसांमध्येच संसर्गबाधितांचा हा आकडा गाठला गेला आहे. दुसऱया लाटेमधील कोरोनाचा अहवाल सकारात्मक येणाऱया बाधितांपैंकी अनेकजण हे वरकरणी लक्षणे दिसत नसलेले वा सौम्य लक्षणे असलेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे दुसऱया लाटेत रुग्णालयात दाखल व्हाव्या लागणाऱया बाधितांचे आणि मृत्यूंचे प्रमाण तुलनने कमी दिसत आहे. कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमधील मृत्युचे प्रमाण (केस फॅटिलिटी रेशो) हे पहिल्या लाटेपेक्षा (1.3%) दुसऱया लाटेमध्ये (0.87%) कमी असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. या लाटेमध्ये संसर्गाचा वेग अधिक आहे. खबरदारीचे योग्य उपाय न केल्यास जून 2021 च्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दर दिवसाला कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 2320 पर्यंत पोहोचू शकते. ही भीती शास्त्रीय आधार दर्शवून व्यक्त केली गेली आहे. हे चित्र टाळण्यासाठी काही उपाययोजनाही या अहवालाने नमूद केल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात लसीकरण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरक्षित अंतरावर भर, वेगाने प्रसार होणाऱया राज्यांमध्ये 45 वयापुढील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱया नागरिकांचे लसीकरण, गंभीर आजार असणाऱया रुग्णांच्या लसीकरणास प्राधान्य, नागरिकांच्या मनात लसीकरणाविषयी असलेली भीती वा गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणास प्रोत्साहित करणे, प्रवास नियमावली, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, लसनिर्मितीच्याबाबतीत स्वावलंबन, लसींचे समन्यायी वाटप, शाळा-महाविद्यालयांच्याबाबतीत प्रतिबंधात्मक उपाय इत्यादि मुद्दे अहवालात नमूद केले आहेत.

कोरोनाचा विषाणु अस्तित्वात येऊन आता जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. माहिती महाजालाच्या माध्यमातून त्याविषयी होत असलेले संशोधन, अभ्यास याविषयी मिळणारी माहिती आणि तिचा उपयोग करणारा समाजातील एक अत्यल्प वर्ग. सामाजिक माध्यमातून मिळणाऱया माहितीला अनेक वेळा पुढे पाठवणारा दुसरा वर्ग. जगण्यासाठी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणारा तिसरा वर्ग आणि परिस्थिती कशीही असली तरी त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारा एक वर्ग. अशी वर्गवारी आपल्याला समाजजीवनात दिसत आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, त्याचे विविध ठिकाणी आढळणारे विभिन्न प्रकार, दुहेरी उत्परिवर्तनी, कोव्हॅक्स, कोविशिल्ड अशा अनेक गोष्टींबाबत अज्ञानी, अर्धवट ज्ञानी आणि महाज्ञानी माणसे वाचाळता दर्शवित आहे. या सर्व वर्गातील नागरिकांचे वर्तन कोरोनासारख्या महामारीत परिस्थितीची गांभिर्यता वाढवण्यास हातभार लावणारे ठरत असते. अज्ञानी आणि अर्धवट ज्ञानी माणसांची संख्या आपल्याकडे अधिक आहे. त्यांच्या आरोग्य साक्षरतेवर आणि नागरी वर्तन शास्त्रांवर भर द्यावा लागेल. महाज्ञानी आहेत त्यांनी परिस्थितीची कारणे न देता सातत्याने संशोधन आणि अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. वैद्यकीय शास्त्रांच्या बरोबरीने सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी प्रत्यक्ष हस्तक्षेपी संशोधन क्षेत्रकार्य करुन आत्पकालीन स्थितीत सामाजिक व्यवहार, मानवी वर्तन यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यकर्त्यांनी विकासाच्या विकेंद्रीकरणावर भर दिला पाहिजे. रोजगारासाठी शहरांकडे धावणाऱया लोंढय़ांना गावातच रोजगार निर्मितीचे पर्याय उभे केले पाहिजेत. ‘आयोग’ येतात, अभ्यास-निरीक्षणे नोंदवतात, ‘अहवाल’ तयार होतात, त्रोटक अंमलबजावणी होते. इतिहास विसरून आपण पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच्या स्थितीत येतो. पुढील काळात अभ्यासक्रमांमध्ये अनुभव शास्त्र आणि नागरिक शास्त्रावर अधिक भर द्यावा लागेल.

 केवळ कागदोपत्री वाढलेला साक्षरतेचा दर आपत्कालीन स्थितीत उपयोगात येत नाही. आपल्याला कौशल्य ज्ञानावर आधारित पिढी तयार करावी लागेल. मागील वषीही, कोरोनाच्या भयानक स्थितीचा आढावा घेत अनेक ठिकाणी कोविड केंदे उभी करण्यात आली होती. रेल्वेचे डबे, उपाहारगृहांचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर, अत्यावश्यक सेवा-सुविधा आणि औषध व्यवस्थापनावर, चाचण्यांमध्ये अधिकाधिक अचूकता आणण्यावर आपण किती भर दिला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. गेल्या काही दिवसात प्राणवायुची वाढती मागणी आणि तुटवडा याबाबतच्या अनेक हृदयद्रावक घटना माध्यमांमधून समोर येत आहेत. त्या संदर्भात प्राणवायुही आज आपल्याला विकत घ्यावा लागत आहे अशा ओळींचे एक चित्र सद्या ‘व्हॉट्सअप’ वर फिरत आहे. टाळेबंदीच्या काळात नद्या स्वच्छ झाल्या, हिमालय पर्वत रांगा दिसू लागल्या या रम्य आठवणीत जगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज समोर येऊन ठेपली आहे.

 कोरोनाच्या महामारीत आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा सर्वाधिक शहरी भागांमधून दिसून येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणि मनुष्यबळ मजबूत करण्याच्या मागणीवर जोर दिला गेला पाहिजे. शहरी भागातील नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल करायला हवा. जेणेकरुन खऱया गरजूंना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्यास मदत होईल. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, आरोग्य निरक्षरता, भ्रष्टाचार, गरीबी, बेताची आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य कर्मचाऱयांची अपुरी संख्या असणाऱया देशांना कोरोनासारख्या महामारीच्या स्थितीत प्रत्येक नागरिकाकडून स्वतःची काळजी, सार्वजनिक नियमांचे पालन आणि संयम या त्रिसूत्रीचे कसोशीने पालन व्हावे, याकरिता काम करावे लागेल.

Related Stories

‘अग्निपथ’ला कंपन्यांचा पाठिंबा

Patil_p

बटाटे वडा पोरका झाला

Patil_p

एशियन पेंटस्च्या निव्वळ नफ्यात वाढ

Patil_p

जीवन्मुक्तीचे लक्षण

Patil_p

नाते आकार घेताना…

Patil_p

भारत 1962 च्या पराभवाचा वचपा काढणार काय?

Patil_p
error: Content is protected !!