Tarun Bharat

आंचिमच्या उद्घाटनाला रणबीर सिंह, सलमान खान

तीनशेंहून जास्त चित्रपटांचे स्क्रीनिंग

प्रज्ञा मणेरीकर /पणजी

भारतातील सर्वांत मोठा महोत्सव मानला जाणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी राजधानीत रंगरंगोटीची कामे तसेच सजावटीची कामे सुरू झाली आहेत. यंदाचा आंचिम हा मागील वर्षाप्रमाणे हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यात येणार असला तरी यंदाच्या आंचिममध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी असण्याची शक्यता आयोजकांकडून वर्तविली जात आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीही उपस्थिती

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आंचिमच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगीच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंह आणि बॉलीवूडचा भाई सलमान खान व इतर दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी वर्तविली आहे. याशिवाय अजूनपर्यंत आंचिमचे उद्घाटन कोण करेल याबद्दलचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. याशिवाय दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कलाकारही आंचिममध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांना आंचिममध्ये वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

जेम्स बॉन्डना महोत्सवात वाहणार श्रद्धांजली

52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेम्स बॉन्डची ही भूमिका करणारे पहिले व्यक्ती सर सीन कोन्नेरी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कोन्नेरी यांचे उत्कृष्ट चित्रपटांची रीघ या महोत्सवात असेल. आंचिममध्ये कोन्नेरी यांचे फ्रॉम रशिया विथ लव्ह, गोल्डफिंगर, यु ऑन्ली लाईव्ह ट्वाईस, द हंट फॉर रेड ऑक्टोबर आणि द अनटचेबल्स हे पाच चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

 ब्रिक्स देशातील चित्रपटांची मांदियाळी

याशिवाय 52व्या आंचिममध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रीक्स देशातील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. याचबरोबर पहिल्यांदाच यंदा आंचिममध्ये कलाकारांशी संवाद साधण्यासाठी ओटीटी व्यासपीठाचा वापर करण्यात येणार आहे. ज्यात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, झी5, वूट, सोनी लिव्ह या व्यासपीठांचा समावेश आहे. यंदाच्या आंचिममधील विविध विभागातून जगभरातील चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सव कॅलिडोस्कोप, आंतरराष्ट्रीय पदार्पण, आयसीएफटी स्पर्धा विभाग, कंट्री फोकस, श्रद्धांजली, मास्टरक्लास, इतर उपक्रम असतील. तसेच आंचिमच्या 52व्या आवृत्तीत 300हून जास्त चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

Related Stories

डिचोलीच्या उमेदवारीवर यावेळी आपलाच हक्क

Patil_p

युतीबाबत 15 दिवसांत कळवा

Amit Kulkarni

मोती डोंगरावर ‘बाबा’ना पाहून ‘बाबू’ भडकले

Amit Kulkarni

पिसुर्लेत पोलिसांची शेतकऱयांवर मर्दुमकी

Amit Kulkarni

कोलमरड येथील कार्यकर्त्यांचा बाबू आजगावकरांना पाठिंबा

Amit Kulkarni

केपेतून 39 उमेदवारी अर्ज सादर

Amit Kulkarni