Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ः एक झलक

गोव्यात 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्ण मयूर प्रदान करण्यात आला. ‘नो एण्ड’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व अभिनेता, असे दोन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून डॅनिएला मारिन नवारो हिला तर असिमिना प्रोड्रू यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून रौप्य मयूर प्राप्त झाला. इंडियन पर्सनालिटी ऑफ द इयर हा भारतीय चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना लाभला. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी पूर्णपणे मोकळय़ा वातावरणात यंदा ‘इफ्फी’ हा चित्रपट महोत्सव गोव्यात पार पडला.

सन 2004 पासून गोव्यात ‘इफ्फी’ साजरा होतो. चित्रपट संस्कृतीची पार्श्वभूमी नसलेल्या गोव्यासाठी चित्रपट महोत्सव हे पहिल्या काही वर्षांत अप्रुपच होते. इफ्फीमुळे गोव्यात चित्रपट निर्मितीला चालना मिळाली का? हा प्रश्न बाजूला ठेवल्यास गोमंतकीय प्रेक्षक आत्ताच कुठे त्यात रुळलेला दिसतो. मुळात गोवा हे छोटे राज्य असल्याने सध्या आघाडीवर असलेली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी व मुंबईच्या बॉलीवूड नगरीत प्रदर्शित होणाऱया चित्रपटांना लाभणारा प्रेक्षक गोव्यात मिळणे कठीण आहे. हल्ली ओटीटी व अन्य माध्यमातून तयार झालेला तरुण प्रेक्षक, काही जुने चित्रपटप्रेमी व इफ्फीच्या ओढीने येणारे पर्यटक हेच काय ते प्रेक्षक. तरीही यंदा विक्रमी अशा दहा हजाराहून अधिक प्रतिनिधींनी या महोत्सवात नोंदणी केली. त्यात अमेरिका, रशिया, युके, दक्षिण कोरिया, फ्रान्स आदींचा समावेश होता. जगभरातील 78 राष्ट्रांमधून 282 चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात समावेश होता. त्यात 183 आंतरराष्ट्रीय तर 97 राष्ट्रीय चित्रपट होते. चित्रपट प्रदर्शना व्यतिरिक्त मास्टर क्लासेस, मणिपुरी चित्रसृष्टीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वेगळे दालन, गाला प्रीमिअर म्हणजेच बारा बहुभाषिक चित्रपटांचे प्रीमिअर, सत्यजित रे यांच्यावरील विशेष विभाग, स्वातंत्र्य चळवळ आणि सिनेमा प्रदर्शन, दिव्यांगांसाठी कार्यशाळा ही काही ठळक वैशिष्टय़े होती. आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी 30 टक्क्यांहून अधिक म्हणजे 50 ते 60 चित्रपट हे महिला निर्मात्या व दिग्दर्शकांचे, हे लक्षणीय म्हणावे लागेल.

भारतीय चित्रपट सृष्टीतील ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान, दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगन, चित्रपट निर्माते शेखर कपूर, अनुपम खेर, मुकेश ऋषी, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी महोत्सवाला उपस्थिती लावली. विविध चर्चासत्रांतून त्यांचे विचार ऐकण्याची संधी नवीन चित्रपट निर्माते व सिनेप्रेमींना लाभली. मराठीतील आघाडीचे निर्माते नागराज मंजुळे, अभिनेते पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह इतर नायक-नायिकांशी झालेल्या संवादातून मराठी चित्रसृष्टीत सध्या काय चालले आहे, याच अंदाज घेता आला.

इंडियन पॅनरोमा विभागात 45 चित्रपटांची निवड झाली. त्यात 25 मोठय़ा आकाराचे चित्रपट तर 20 लघुपट, याशिवाय मराठी व कोकणी चित्रपटांचाही त्यात समावेश होता. ‘कंट्री फोकस’ विभागात पंधरा भारतीय व पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होता. यावर्षी दिवंगत झालेले भारतीय चित्रपट व संगीत सृष्टीतील दिग्गज कलाकार लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, भूपेंद्र सिंग, कृष्णकुमार, बिर्जू महाराज, शिवकुमार शर्मा यांच्यावरील चित्रपटही श्रोत्यांसाठी पर्वणी ठरली.

बिहारी चित्रपट सृष्टीवरही वेगळय़ा दालनातून इफ्फीमध्ये प्रकाशझोत पडला. मूळ बिहारवासी असलेल्या पंकज त्रिपाठी यांनी बिहारमध्ये चित्रपट निर्मितीला चालना देण्यावर भर दिला. गोमंतकीय विभागात यंदा सहा लघुपट व एका पूर्ण चित्रपटाचा प्रीमिअर झाला. ‘अर्धो दिस’, ‘बिफोर आय स्लीप’सारख्या लघुपटांनी गोव्यातील कौटुंबिक व सामाजिक विषय कल्पकतेने मांडले. गोव्यात मोठे बजेट व पूर्ण फिचर फिल्मची निर्मिती शक्य नसली तरी शॉर्ट फिल्म बनविणाऱया नवीन कलाकारांना इफ्फी हे व्यासपीठ ठरत आहे.

संगीतकार ए. आर. रेहमान व अन्य काही निर्मात्यांनी येणाऱया काळात बदलत्या तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत होऊ घातलेल्या बदलांचे संकेत दिले. सिनेमाचे विश्व आभासी तंत्रज्ञानामुळे बदलणार असून भविष्यात सिनेमे पाहताना प्रेक्षकच त्यातील कलाकार आहेत, असे भासेल. येणाऱया काळात होऊ घातलेल्या बदलांची कल्पना त्यांनी दिली मात्र त्यात कला व नैतिकता हरवता कामा नये, असाही सूर त्यांनी व्यक्त केला. ऍनिमेशनपटावरही चर्चा झाली. ऍनिमेशन सिनेमे हे केवळ लहान मुलांचे चित्रपट आहेत, असा भारतात समज आहे. प्रत्यक्षात ऍनिमेशन सिने इंडस्ट्री ही खूप मोठी आहे व त्यात सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. पुढच्या इफ्फीत ऍनिमेशन सिने विभाग आवश्यक असल्याची गरज प्रसाद आजगावकर यांनी व्यक्त केली.

महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या विशेष विभागात जयदीप मुखर्जी यांचा ‘अदर रे ः द आर्ट ऑफ सत्यजित रे’ हा माहितीपट हे वेगळेपण होते. सत्यजीत रे यांचे ‘सतरंज के खिडाली’ व ‘गणशत्रू’ हे दोन चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पर्यावरणीय प्रश्न, समाजातील दुर्लक्षित घटकांचे उपेक्षित जीवन, असे वास्तवदर्शी लघुपट व चित्रपटांवरही प्रकाशझोत पडला. आसाममधील ‘हत्ती व मानवी संघर्ष’ यावर आधारित ‘हातीबंधू’ ही संकल्पना दिग्दर्शक कपिल कलित यांच्याकडून ऐकायला मिळाली. हिंदी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्यावर बनलेला ‘महानंदा’ तसेच रस्त्याच्याकडेला भीक मागणाऱया महिलांवर आधारित ‘रेखा’ या चित्रपटांवरही चर्चा झाली. शिक्षणासाठी धडपडणाऱया कोवळय़ा मुलीची कथा म्हणजेच ‘सुमी’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गोळे यांनी बालपटांच्या निर्मितीवर आपले विचार प्रकर्षाने मांडले. पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे दिव्यांगासाठी घेतलेली कार्यशाळा हे यंदाच्या महोत्सवाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. फिल्म बाजारमध्ये कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, बांग्लादेश, पश्चिम बंगाल या भाषांतील सिनेमे दाखविण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपटांनी आज थिएटरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत धुमाकूळ घातला असून इफ्फीवरही यंदा त्याचा प्रभाव दिसून आला. यंदा इफ्फीला विक्रमी प्रतिसाद लाभला तरी आयोजनामधील अनेक त्रुटी, निमंत्रक व प्रतिनिधींची झालेली गैरसोय यामुळे नाराजीही दिसून आली. स्थानिक प्रसार माध्यमे सोडल्यास राष्ट्रीय माध्यमांकडून गोव्यातील इफ्फी केव्हाच बेदखल झाला आहे. याशिवाय केरळ व अन्य राज्यांमधील चित्रपट महोत्सवांच्या तुलनेत इफ्फीवरील खर्च व दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सदानंद सतरकर

Related Stories

थोडक्यासाठी ‘आशा’ची निराशा नको!

Patil_p

कोरोनाचा वाढता मृत्यूदर कोकणसाठी चिंताजनक!

Patil_p

कोकणात शिवसेना संघटनेसाठी आव्हान

Patil_p

इंटरनेट- एक वाढते व्यसन

Amit Kulkarni

मराठी पाऊल पडते कुठे

Patil_p

पंतप्रधानांचा डबल इंजिनला दुसऱयांदा स्टार्टर!

Patil_p