Tarun Bharat

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन

केंद्राकडून नियमावली : 11 जानेवारीपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अन्य देशातून भारतात दाखल होणाऱया प्रवाशांना 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन अनिवार्य करण्याचा आदेश केंद्र सरकारने शुक्रवारी दिला. सात दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. सदर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सर्वसामान्यांमध्ये वावरण्याची मोकळीक मिळणार आहे. दरम्यान, हे आदेश 11 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशांना त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावे लागेल. त्यानंतरच ते त्यांच्या इच्छित स्थळी किंवा पुढच्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी जाऊ शकतील. यासंदर्भात पूर्ण आणि सत्य माहिती ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर देण्याचे आवाहन सरकारने प्रवाशांना केले आहे.

देशातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तेथे कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. मात्र, चाचणी पॉझिटिव्ह आल्यास इन्स्टिटय़ुशनल क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

‘जोखीमग्रस्त’मध्ये 9 नवे देश समाविष्ट

1 डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 11 देशांना जोखीममध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या देशांमध्ये ब्रिटन, युरोपीयन देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश करण्यात आला होता. आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, त्यात आणखी 9 देशांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देशांमध्ये घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, टय़ुनिशिया आणि झांबिया आदी देशांचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

निश्चलनीकरणानंतर नोटा बदलून न घेणाऱयांच्या पदरी निराशा

Patil_p

गुजरात किनारपट्टीजवळ मालवाहू जहाजांची धडक

Patil_p

एमएसपी कायद्यावर चर्चेस सरकार तयार

Patil_p

मोदींच्या हस्ते मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन

Patil_p

पंतप्रधानांचा गुजरातमध्ये कार्यक्रमांचा धडाका

Patil_p

बॉक्सर, पोलीस अधिकारी अन् मॉडेल

Patil_p