Tarun Bharat

आंदोलनाची धास्ती, कामाला सुरुवात, मात्र रास्तारोको करणारच

कंग्राळी खुर्द ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्यासाठी आज आंदोलन

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी ते कंग्राळी खुर्द रस्त्यासाठी बुधवार दि. 11 रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे. याची धास्ती घेवून प्रशासन आणि कंत्राटदाराने पुन्हा रस्ते कामाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा इशारा देताच धास्तीने कामाला सुरूवात झाली असली तरी रास्तारोको करणारच असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून केळव दीड ते दोन कि. मी. च्या रस्त्यासाठी वारंवार आंदोलने आणि निवेदन, रास्तारोको करण्यात आले. मात्र निद्रीस्त प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बुधवारी रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा देताच मंगळवारी कंत्राटदाराने रस्ते खोदाई कामाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन होवू नये या दृष्टिकोनातूनच कामाला गती देण्यात आली आहे. मात्र संतापलेल्या नागरिकांनी हे आंदोलन करणारच असा इशारा दिला आहे.

सध्याचे जे काम सुरू आहे ते अत्यंत संथगतीने चालु आहे. या रस्त्यावरुन ये-जा करणे देखील कठीण झाले आहे. सलग तीन वर्षे कंग्राळीसह महाराष्ट्रापर्यंतच्या खेडय़ांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱयांची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखलेल्या एपीएमसीला देखील ये-जा करणे कठीण बनले आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, स्मार्टसिटीच्या अधिकाऱयांना थोडी देखील चाड नाही. मागील दीड वर्षांपूर्वी आंदोलन छेडण्यात आले होते तेंव्हा एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी हे आंदोलन चिरडण्यासाठी मोठी आश्वासने दिली. मात्र यावेळी जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून ग्रहण लागलेल्या एपीएमसी ते कंग्राळी खुर्दपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु झाले. या रस्त्यासाठी रास्तारोको, आंदोलने, निवेदने आणि मोर्चाही काढण्यात आला. मात्र काम अर्धवट केल्यामुळे हा रस्ता जीव घेणा ठरत आहे. या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. यामुळे अनेकांना आर्थिक व शारिरीक फटका बसत आहे. त्यामुळेच आता संयम सुटला असून या रस्त्यासाठी वारंवार अपघातांना तोंड देण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाला एकदाच तेंड देण्यासाठी समस्त जनता तयार झाली आहे. बुधवारी मोठय़ा प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असून याबाबत रुपरेषाही ठरविण्यात आली आहे. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशाराही देण्यात आला आहे.

रस्ता करावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नावे शिमगा केला तरी काहीच फरक पडला नाहे. त्यामुळे आता पुन्हा या रस्त्यासाठी जोरदार आंदोलन छेडून नागरिकांच्या हक्कासाठी बुधवारी रास्तारोको करण्यात येणार आहे. तेंव्हा पंचक्रोशीतील नागरिकांनी यामध्ये सहभाग दर्शवावा आणि कातड घेवून झोपलेल्या प्रशासनाला आणि कंत्राटदाराला जागे करण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करुया, असे आवाहनही ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

Related Stories

कोनवाळ गल्लीतील नाला की कचरा डेपो?

Amit Kulkarni

निपाणी तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

Patil_p

ओव्हर ब्रिजवरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

जुन्या तहसीलदार कार्यालयात अस्वच्छता

Amit Kulkarni

संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती द्या

Omkar B

पोस्ट कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p