ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील फार्मा सिटी मधील सैनर लाइफ सायन्स फार्मा कंपनीत सोमवारी रात्री गॅस गळती झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. ज्यावेळी गॅस गळती झाली त्यावेळी फार्मा कंपनीत 30 लोक काम करत होते. यावेळी सहा कर्मचाऱ्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य चार जणांवर उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून तात्काळ कंपनी बंद करण्यात आली.
परवदा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर उदय कुमार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस गळती झालेल्या कंपनीतील स्थिती नियंत्रणात आहे. मृत पावलेले दोन्ही व्यक्ती हे या कंपनीतील कामगार असून, गॅस गळती झाली त्यावेळी ते कंपनीत काम करत होते. मृतांची ओळख पटली असून नरेंद्र आणि गौरी शंकर अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.